महेश बोकडे

ब्रह्मांडनायक युवा विकास परिषदेचा अभिनव उपक्रम; गुळाचा शिरा, कडधान्याचे वडे, उकळपेंडी ग्राहकांना भावतेय

नागपूरसह सर्वत्र लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत पाश्चिमात्य खाद्यपदार्थाचे आकर्षण वाढले आहे. सर्वच उपाहारगृहांमध्ये हे पदार्थ हमखास मिळतात. परंतु सामान्यांच्या आरोग्यासाठी ब्रम्हांडनायक युवा विकास परिषदेने नागपूरसह विदर्भात १३ फिरत्या उपाहारगृहातून पारंपरिक चटपटीत न्याहारी उपलब्ध केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला खवय्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागपूरसह विदर्भात अनेक वर्षांपासून चना-पोहा, उपमा, गुळाचा शिरा, उकळपेंढी, कडधान्याचे वडे, साबुदानाची खिचडी, मोठची उसळ, साबुदान्याचे वडे, गुळाचा चहासह इतरही अनेक पारंपरिक खाद्यपदार्थ खाल्ले जायचे. हळूहळू या पदार्थाचे नागरिकांमधील आकर्षण कमी होत गेले, परंतु पूर्वी या पदार्थाचे नावही उच्चारल्यास प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटायचे. आता पिज्जा, नुडल्स,  फास्ट फूड व जंक फूडचे आकर्षण आहे. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांपासून इतरही वयोगटात विविध आजार वाढत असल्याचे जगभरातील वैद्यकीय संशोधनातून पुढे आले आहे.

ब्रम्हांडनायक युवा विकास परिषदेने नागरिकांची ही सवय सुधारण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या पदार्थाची उपलब्धता असणारे फिरते उपाहारगृह सुरू केले आहे. त्यासाठी वाहनात विशिष्ट बदल केले आहे.  लॉ कॉलेज चौकातील विधि महाविद्यालयापुढे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सध्या प्रत्येकी एक उपाहारगृह खवय्यांची भूक भागवत आहे. येथे खवय्यांना पानाच्या द्रोणात पदार्थ उपलब्ध केले जातात.

फिरते उपाहारगृह असलेली स्थळे

* लॉ कॉलेज चौक, नागपूर</p>

* जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर

* हजारी पहाड, नागपूर

* बसस्थानक जवळ, परतवाडा

* अचलपूर रोड, परतवाडा

* दुराणी चौक, परतवाडा

* उपजिल्हा रुग्णालयाजवळ, अचलपूर

* दर्यापूर रोड, अंजनगाव

* वर्धा रोड, काटोल (नागपूर)

* अमरावती रोड, चांदूर बाजार

* बसस्थानकजवळ, मोर्शी

* परतवाडा रोड, अमरावती

* बसस्थानकजवळ, वरूड (नागपूर)

५० हून अधिक तरुणांना रोजगार

संस्थेची विविध प्रकारची दोन ते तीन वाहने आहेत. याद्वारे पन्नासाहून अधिक तरुणांना रोजगार मिळत आहे. या संकल्पनेत उपाहारगृह परिसरात अस्वच्छता होऊ दिली जात नाही. हा उपक्रम आणखी वाढवला जाणार आहे.

– भूषण कोंडे, अध्यक्ष, ब्रम्हांडनायक युवा विकास परिषद.

इडली- सांभारवडाही लोकप्रिय

नागपुरात इडली आणि सांभारवडय़ाला जास्त मागणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार येथे हे दोन्ही पदार्थ ठेवतो. ते लोकप्रिय होत आहेत.

– यादवराव कोठे, सदस्य, ब्रम्हांडनायक, लॉ- कॉलेज चौक.