विनाअडथळे वाहतुकीसाठी योजना

नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरचे सर्व प्रकारचे गतिरोधक हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक, विशेषत: टोल नाक्याजवळची वाहतूक विनाअडथळा रहावी, या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने हे पाऊ ल उचलले आहे.

पथकर नाक्यावर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सध्या देशभरातील पथकर नाक्यांवर १५ डिसेंबर २०१९ पासून ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामुळे फास्टॅग स्टीकर्स लावणाऱ्या वाहनांना पथकर नाक्यावर थांबण्याची गरज नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होते. याला सर्वच नाक्यांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र टोलनाक्यांवर वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून गतिरोधक लावण्यात आले आहे. यामुळे वाहनांची गती कमी होत असल्याने त्यांना निर्धारित स्थळी पोहचण्यास विलंब होतो. तसेच गतिरोधकामुळे वाहनांमधील प्रवाशांना धक्के बसते. त्याचा फटका रुग्ण किंवा वृद्ध नागरिकांना बसतो. त्यामुळे सर्व महामार्गावरील तसेच पथकर नाक्याजवळील गतिरोधक तसेच रंबल स्ट्रिप्स तातडीने हटवण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्यावतीने नुकत्याच जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची असुविधा दूर होण्यासोबतच वेळ आणि पैशाची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्य़ातून तीन महामार्ग जातात.(महामार्ग क्र. ६९ सावनेरकडे, क्र.७-रामटेककडे आणि क्रं ६ अमरावती) सोबतच नागपूर -मुंबई द्रूतगती महामार्गाचेही काम सध्या सुरू आहे. महामार्गादरम्यान येणारी गावे किंवा चौरस्ता किंवा तत्सम ठिकाणी गतिरोधक लावण्यात आले आहे. आता ते हटवण्यात येणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने इतर उपाययोजना करणे आवश्यक ठरणार आहे. गावे किंवा तत्सम ठिकाणी लोखंडी कठडे लावण्यात आल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.