नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सातवर काही दिवसांपूर्वीच  वाहनाच्या धडके त जखमी झालेल्या वाघाच्या नशिबी कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाघाच्या पायाला मोठा मार लागला असून हाडांचा चुराडा झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात हा वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. या महामार्गावर खबरदारीचा अपूर्ण उपाय योजनांअभावी अनेक वन्यप्राणी मृत्युमुखी तसेच जखमी झाले आहेत.  महामार्गावरील देवलापारजवळ वन्यप्राण्यांसाठी करण्यात आलेली उपाययोजना(३०० मीटरचा उड्डाणपूल) चुकीची असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. याचठिकाणी काही वर्षांपूर्वी भरधाव वाहनाच्या धडके त बिबट मृत्युमुखी पडला होता. मात्र, ही घटना त्यावेळी लपवण्यात आली. वन्यप्राण्यांसाठी येथे भूयारी मार्ग आहे आणि या वाघानेही हा मार्ग नक्कीच ओलांडला असेल. भूयारीमार्गानलंतर देवलापार वनक्षेत्राजवळील एका गावाकडे जाणाऱ्या जुन्या डांबरी रस्त्यापासून काही मीटर अंतरावर  हा वाघ जखमी अवस्थेत आढळला. या परिसरात गावकरी तसेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. वाघांच्या भ्रमणमार्गावर काम करणाऱ्या एका संस्थेने वन्यप्राण्यांचे अपघात थांबवायचे असतील तर त्यांची हालचाल असणाऱ्या या ठिकाणाहून गावकरी तसेच वाहनांची ये-जा कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.  सध्या या वाघावर गोरेवाडा उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत.