उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

नागपूर : इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या महिलेचे पती भारतात (नागपुरात) स्थायिक झाले. त्यामुळे मुलाला आईच्या ताब्यात दिल्यास त्याच्या वडिलाला भेटता येणार नाही. मात्र, महिला भारतात येणे-जाणे करू शकते, हे विचारात घेऊन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ वर्षीय मुलाचा ताबा त्याच्या वडिलाकडे दिला.

राजेश आणि रागिनी (नाव बदललेली) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. राजेश हा अस्थिरोग तज्ज्ञ आहे, तर रागिनी ही मानसोपचारतज्ज्ञ आहे. शिक्षण घेत असताना २००३ मध्ये त्यांची इंग्लंडमध्ये ओळख झाली. त्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी राजेश हा नागपुरात परत आला. त्यानंतर नोकरीसाठी पुन्हा तो इंग्लंडला गेला. रागिनी ही मुस्लीम असून राजेश हा हिंदू आहे. दोघांनी १६ फेब्रुवारी २००८ ला प्रेमविवाह केला. २०१० मध्ये त्यांना एक मुलगा झाला.

मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये राजेश मुलाला घेऊन भारतात परतला व नागपुरात स्थायिक झाला. दरम्यान, रागिनी ही इंग्लंडमध्येच नोकरी करीत होती.

काही दिवसांनी भारतात (दिल्ली)परतल्यावर तिने मुलाचा ताबा मिळावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन १३ एप्रिल २०१८ ला कौटुंबिक न्यायालयाने मुलाचा ताबा आईला दिला. त्याविरुद्ध राजेशने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर  न्या. रवि देशपांडे आणि न्या. अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

न्यायालयाने मुलाचे मत जाणून घेतले. त्यानंतर न्यायालयाने मुलाच्या भेटीबाबत दोघांनाही प्रस्ताव देण्यास सांगितले. रागिनी ही इंग्लंडमध्ये नोकरी करते. तिच्याकडे मुलाचा ताबा दिल्यास ती मुलाला इंग्लंडला घेऊन जाईल व वडिलाला त्याला भेटण्यासाठी बंधने येतील. त्या व्यतिरिक्त रागिनी आपल्या मुलाला दिल्ली येथे भावाकडे ठेवेल. त्यापेक्षा तो नागपुरात वडिलांकडे असणे चांगले आहे. रागिनी वर्षांतून दोनदा भारतात येत असल्याने तिला त्या काळात पूर्णवेळ मुलाला भेटता येईल, आ निर्वाळा न्यायालयाने दिला.