बापानेच १३ मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

बाबुराव असे आरोपीचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करतो. त्याची पत्नी एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्याला दोन मुली आहेत. आरोपी शाळेतून दुपारी एक वाजताच्या सुमारास घरी येतो तर त्याची पत्नी तीन वाजता कामावर जाते. अनेक वेळा त्याच्या पत्नीला रुग्णालयात रात्रपाळीही करावी लागायची. ही संधी साधत नराधाम बाप पोटच्या गोळ्यावरच तोंड काळे करायचा. घटनेची बाहेर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचा. कामाच्या व्यापामुळे पीडिताच्या आईचेही याकडे लक्ष नव्हते. मात्र, मुलीने ही बाब मैत्रिणीला सांगितली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बापाकडूनच होणाऱ्या अत्याचारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. शाळेत कुणाशीही बोलत नव्हती. मैत्रिणीने तिला विचारल्यावर ती रडायला लागली. तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती तिने दिली.

मैत्रिणीने वर्गशिक्षकेला व शिक्षकाने प्राचार्याना माहिती दिली. प्राचार्यानी मुलीच्या आईला शाळेत बोलावून हा प्रकार सांगितला. मात्र, सुरुवातीला आईचा त्यावर विश्वास बसला नाही, परंतु एकदा तिने स्वत:च्या डोळ्यांनीच ही बाब बघितली. त्याचवेळी तिने पतीला घरातून हाकलून दिले. मुलीची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांत तक्रार केली नाही. या घटनेमुळे मुलगी घाबरली होती. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेला कळताच त्यांनी मुलीच्या आईचे समुपदेशन केले. याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दिली.