* हारुभाईसह तिघांच्या उद्योगांवर कारवाई  * आतापर्यंत सुमारे तीन कोटींची सुपारी पकडली

सडलेल्या सुपारीचा गोरखधंदा करून लोकांच्या जीव धोक्यात घालणाऱ्या सुपारी व्यापाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई मोहीम राबवली असून आज मंगळवारी शहरातील दोन सुपारी व्यापाऱ्यांसह तीन ठिकाणी छापे टाकले. यात सुपारी व्यापारी संघटनेचा अध्यक्ष हारुभाई ऊर्फ हरीश किसनानी यांच्या दिया गृहउद्योगचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांत अडीच कोटी आणि आतापर्यंत तीन कोटींची सडलेली सुपारी जप्त करण्यात आली, हे विशेष.

मध्य भारतात खर्रा, पान, गुटखा, मिठी सुपारी आदींची मोठी बाजारपेठ आहे. या उद्योगांमध्ये फोडलेली सुपारी मोठय़ा प्रमाणात उपयोगात आणण्यात येत असून देशातील सर्वात मोठा सुपारीचा व्यवसाय नागपुरातून चालतो. केरळमधून शहरात चांगल्या दर्जाची सुपारी येत असून या सुपारीवर व्यापाऱ्यांना कमी नफा मिळतो. त्यामुळे सुपारी व्यापारी इंडोनेशिया, नायजेरिया येथून सडलेली सुपारीची आयात करतात. त्यानंतर ती सुपारी सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजून ती फोडण्यात येते. त्याचा वापर विविध गुटखा व पानठेल्यांवर करण्यात येतो. सल्फर लागल्याने सुपारी विषारी होते आणि मानवी आरोग्यास हानिकारक ठरते. या व्यवसायासंदर्भात ‘लोकसत्ता’ वृत्तमालिका चालवली. त्या वृत्तांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दखल घेतली आणि अन्न व औषध प्रशासनाला त्यावर अहवाल मागविला. त्यानंतर अन्न प्रशासनचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी शहरातील सडलेल्या सुपारीचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली. त्यानंतर कळमना परिसरातील प्रकाश वाधवानी यांचे शीतगृह, मौया यांचा कारखाना, वाडी येथील अनिल जैन यांच्या मालकीच्या विद्यासागर रोडलाईन्सच्या गोदामावर छापा टाकला. त्यानंतर आज मंगळवारी केकरे यांच्या मार्गदर्शनात दक्षता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, अमित उपलप, प्रवीण उमप, विनोद धवड, प्रफुल्ल टोपले आणि सीमा सुरकर यांनी कळमना परिसरातील चिखली येथील हारुभाईच्या दिया गृहउद्योगाच्या गोदामावर छापा टाकला. त्या ठिकाणी ३ लाख ७५ हजारांची सडलेली सुपारी पकडली, तर चिखलीतीलच संजय पटना यांच्या गोदामावर छापा टाकून १५ लाख ७५ हजारांची सडलेली सुपारी पकडली. तसेच इतवारी येथून प्रभू ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून ३५० किलो निकृष्ट दर्जाचे सोयाबीन तेल जप्त केले. त्याची किंमत ६२ हजार रुपये सांगण्यात येत आहे.

कलीवाला, अल्ताफ, नेतावर केव्हा कारवाई?

एका युवासेनेच्या नेत्याने फिरोज नावाच्या व्यक्तीला हाताशी धरून सुपारी भाजण्यासाठी सल्फर डायऑक्साईडची भट्टी सुरू केली. ही भट्टी आता एका भाडय़ाच्या इमारतीत सुरू आहे. याशिवाय सुपारी तस्करीत कलीवाला आणि अल्ताफ यांचे नावही घेतले जाते. त्याशिवाय टिकू, जतीन, नेपाली, राजू अण्णा, राजू एचपी, गणपती, तिरुपती, महेंद्र काल्या यांचेही सुपारी तस्करीमध्ये नाव घेतले जाते.

अन्न सुरक्षा अधिकारी गेडाम यांना कारणे दाखवा

वाडी परिसरातील अनिल जैन यांच्या गोदामावर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम यांना बोलावले. त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि गेडाम यांनी मिळून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दोन दिवस सुपारीचे नमुने घेतले नाही. याची माहिती लोकसत्ताने सहआयुक्त केकरे यांना दिली. त्यानंतर केकरे यांनी गेडाम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आज मंगळवारी पुन्हा अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी यांच्या नेतृत्वात जैन यांच्या गोदामावर पुन्हा कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ कोटी ५४ लाखांची सडलेली सुपारी जप्त केली. आजच्या कारवाईवेळी गेडाम यांना दूर ठेवण्यात आले हे विशेष.