खुल्या मिठाईवर कालबाह्य़ मुदत टाकणे बंधनकारक

नागपूर : हलवाई अथवा हॉटेलमध्ये असलेल्या खुल्या मिठाईवर कालबाह्य़ मुदतीची तारीख (बेस्ट बिफोर) ठळकपणे नमूद करणे अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने बंधनकारक केले असून हा नवा कायदा देशातील सर्व राज्यात लागू केला आहे. तसे निर्देश सर्व

राज्यांना दिले आहे. राज्यात या नियमाची अमंलबजावणी १ऑक्टोबरपासून होणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. यादृष्टीने उत्पादन व विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे.

मिठाईच्या दुकानातील गोड पदार्थ किती दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो, हे सध्या नेमके ग्राहकांना कळत नाही. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना शिळी मिठाई मिळते. दुधापासून तयार झालेल्या मिठाया जास्त दिवस टिकत नाहीत. तरी त्याची विक्री अनेक दिवस होत असते. मात्र अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाने १ऑक्टोबरपासून नवा कायदा देशातील सर्व राज्यात लागू केला असून गुरुवारपासून त्याची अमंलबजावणी होत आहे. सर्व राज्यांना याबाबत निर्देश दिले आहे.

यासाठी महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. खुल्या मिठाईच्या पुढे ती कधी तयार झाली व किती दिवस खाण्यायोग्य असू शकते, याची तारीख विक्रेत्यांना टाकावी लागणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मिठाईची कालब्ह्य’ होण्याची मुदत कळणार आहे. नामांकित मिठाई विक्रेते काही प्रमाणात डबाबंद मिठाईच्या वेष्टणावर ती तयार झाल्याची व एक्सपायरीची तारीख छापत असतात. मात्र खुल्या मिठाईसाठीही आता तोच नियम लावण्यात आला आहे. अनेक पॅकबंद तसेच ब्रॅण्डेड पदार्थावर उत्पादनाची तारीख आणि ते कधीपर्यंत वापरता येणार हे नमूद केलेले असते. रसगुल्ला, गुलाबजाम सारखे पदार्थ पॅकबंद स्वरूपात उपलब्ध असल्याने ते कधीपर्यंत वापरता येतील हे नमूद असते. त्यामुळे अशा कंपन्यांना एफएसएसआयच्या आदेशाचा फटका बसणार नाही.

मात्र देशभरात लाखो मिठाईची दुकाने असून जिथे मिठाई फार पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने तयार करून विकली जाते. पण त्यावर  तारीख नमूद केली जात नाही.  मिठाई, गोड पदार्थात तूप, साखर, खवा यांचा वापर केला जातो. मात्र या घटकातून भेसळ होण्याची दाट शक्यता असते. याला आळा बसावा यासाठी हा नवा नियम बनवण्यात आला आहे.

आदेश काय?

आपण अनेकदा पॅकबंद पदार्थाऐवजी सुटी मिठाई खाणे पसंत करतो. मात्र, यामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. काहीवेळेस या पदार्थामध्ये भेसळ करून मिठाई विक्रेता ग्राहकांना फसवत असतो. मात्र आता यापुढे अशा मिठाई विक्रेत्यांना कायद्याचा दणका बसणार आहे. अन्नसुरक्षा प्राधिकरण विभाग आता अशा पदार्थाच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी एक नियम जारी करणार आहे. सोमवारी यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. यानुसार विक्रेत्यांना सुटी मिठाई विकताना ती कधी तयार केली आणि किती तारखेपर्यंत ग्राहक ती वापरू शकतो, या स्वरूपाची पाटी मिठाईच्या ट्रेवर लावणे आता बंधनकारक असणार आहे.

नव्या कायद्याच्या अमंलबजावणीच्या सूचना राज्यातील विभागाला कळवल्या आहेत. विभागातील अधिकारी सज्ज असून गुरुवारपासून तपासणी सुरू होईल. प्रत्येक मिठाई विक्रेत्याला नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल अन्यथा करवाई केली जाईल.

 शशिकांत केंकरे, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन मुख्यालय मुंबई</strong>