विधानभवन परिसरात पन्नासवर आंदोलने * सर्वपक्षीय आमदारांमध्ये चढाओढ
नागपूरला ७ ते २३ डिसेंबरदरम्यान झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर सगळ्याच पक्षांच्या आमदारांकडून पन्नासवर आंदोलने करण्यात आली. त्यातील काही आमदारांना विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहात बोलण्यापेक्षा पायऱ्यांवरील नाटय़ात जास्त रस असल्याचे चित्र होते. आंदोलनाकरिता विविध पक्षांच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली होती. आंदोलनाच्या माध्यमातून परिसरात ‘कधी हुक्का पार्लर’, तर ‘कधी हुतात्मा स्मारक’ची प्रतिकृती उभारली गेली.
राज्यातील मागासलेल्या भागांना न्याय मिळावा म्हणून हे अधिवेशन दरवर्षी घेतले जाते. यातून शेतकरी, कष्टकरी, विविध जातींचे नागरिक, उद्योजक, विद्यार्थ्यांसह इतरांना काय मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष असते. राज्याच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांकडून त्यांच्या भागातील प्रश्न सभागृहात मांडले जाण्याची नागरिकांची अपेक्षा होती, परंतु काही आमदारांना हे प्रश्न सभागृहात मांडण्यापेक्षा पायऱ्यांवर बॅनर्स, पोस्टर्स घेऊन निदर्शने करण्याचे नाटय़ करण्यात जास्त रस असल्याचे दिसले. बऱ्याच आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडल्यावर व त्यांना तेथे उत्तरे मिळाल्यावरही बाहेर प्रसिद्धीमाध्यमांसमोर दिसण्याकरिता विविध आंदोलनांच्या क्लुप्त्या लढवल्या. काही आमदारांनी सभागृहात न्याय न मिळाल्यावर आंदोलन केल्याचेही याप्रसंगी पुढे आले. आंदोलनाच्या पहिल्या आठवडय़ात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नको, तर पॅकेज जाहीर करून कर्जमुक्तीची मागणी परिसरात लावून जोरदार आंदोलन केले. दरम्यान, बच्चू कडू यांनी हात बांधून तीन दिवस अपंगांना न्याय देण्याची मागणी लावून धरली. अबू आझमी यांनी अधिवेशनात मोकाट गुरांकरिता गोशाळा बांधा, राज्यात दारूबंदी करा, नागपूर रेल्वेस्थानकाला ताजुद्दीन बाबांचे नाव देण्यासाठी आंदोलन केले.
आमदार आशिष देशमुख, डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार सुनील शिंदेंसह बऱ्याच आमदारांनी संत्र्याकरिता विविध आंदोलन केले. विदर्भाबाहेरच्या विविध पक्षांच्या आमदारांनीही स्मार्ट सिटी योजना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करा, कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करा, यासह विविध मागण्या लावून धरल्या. सत्तापक्षात असतांनाही शिवसेनेने महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्याच्या बाबतीत विरोधी पक्षाप्रमाणे भूमिका बजावत अनेकदा निदर्शने केली. परिसरात हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती उभारून त्याला पुष्पांजली दिल्यावर ते विधानसभा अध्यक्षांना भेट देण्यात आले.
विजय वडेट्टीवार, सुमन पाटील यांच्यासह इतर अनेक आमदारांनी विविध मागण्यांकरिता उपोषणास्त्रही येथे उगारले. वर्षां गायकवाड यांच्यासह इतर महिला आमदारांनी मंदिरात महिलांना प्रवेशाकरिता शनी मंदिराची प्रतिकृती तयार करून त्यात प्रवेश केला, तर दुसऱ्या आंदोलनात परिसरात प्रतिकात्मक हुक्का पार्लर करून हे प्रकार राज्यात बंद करण्याची मागणी केली. काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या मदतीकरिता िदडी काढून भजन गात विठ्ठलाला साकडे घालण्यात आले. भाजपकडूनही नागपूर रेल्वेस्थानकाला डॉ. हेडगेवारांचे नाव देण्यासह बरीच आंदोलने केली गेली. तेव्हा विधान भवन परिसरात आंदोलन करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र होते.

आंदोलनातील संत्री व कांदा कचऱ्यात
विधानभवन परिसरात सगळ्याच पक्षातील बऱ्याच आमदारांनी संत्री व कांदाच्या माळा गळ्यात घालणे, यासह विविध प्रकारे आंदोलने करून साऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलन झाल्याच्या काही तासातच ही संत्री व कांदाच्या माळा कचऱ्याच्या डब्यात पडून असल्याचे चित्र होते. राज्यात काही नागरिकांना दोन वेळचे धड खायलाही मिळत नसतानाही आंदोलकांच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त होत होते.