दुकान उघडण्याची परवानगी देण्याची मागणी 

नागपूर : टाळेबंदीमुळे इतर व्यवसायाप्रमाणे मोबाईल व्यावसायिक अडचणीत सापडले असून गेल्या दोन महिन्यात त्यांना पन्नास कोटींहून अधिकचा फटका बसला आहे. या व्यवसायाशी संबंधित दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

मोबाईलमुळे अवघे जग हातात आले आहे. प्रत्येक घडामोड मोबाईलमुळे पटकन कळते. व्हिडीओ कॉलमुळे स्क्रिनवर पाहून एकमेकांशी संवाद साधता येतो. त्यामुळे अवघड कामे सहज सोपी झाली आहेत. मात्र टाळेबंदीमुळे सर्व मोबाईलची दुकाने बंद आहेत. आधीच ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे त्रस्त झालेल्या मोबाईल व्यावसायिकांना आता टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. शहरात एक हजाराच्या आसपास मोबाईलची लहान-मोठी दुकाने आहेत. मोठय़ा मोबाईल दुकानदारांची माहिन्याला चार लाखांची उलाढाल आहे. तर छोटा दुकानदारांची एका लाखाची उलाढाल आहे. मात्र करोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता राज्यात संचारबंदी आणि त्यानंतर टाळेबंदी जाहीर झाली. सर्व मॉल्स व मोबाईलची दुकाने बंद आहेत. त्यामुळे दररोजचा या व्यावसायिकांना कोटय़वधींचा फटका बसत आहे. मोठय़ा दुकानदारांना वर्षांला दोन ते तीन कोटींचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीत एक हजार मोबाईलच्या दुकानदारांचे पन्नास कोटींहून जास्त तोटा गेल्या दोन महिन्यात झाला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील गुढीपाडवा आणि त्यानंतर अक्षय्य तृतीया या दिवसाला दुप्पट उलाढाल होत असते. मात्र हे दोन्ही सण टाळेबंदीत आल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मोबाईल दुरुस्ती आणि मोबाईल संबंधित वस्तू खरेदी-विक्री ही मोठी असते. त्याशिवाय मोबाईल व्यवसायाशी जुळलेल्या दहा हजारावर कर्मचाऱ्यांना टाळेबंदीमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. मोबाईल देखील आजच्या काळात जीवनावश्यक वस्तू बनली असून सामाजिक अंतर लक्षात घेता मोबाईलची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

टाळेबंदीमुळे मोबाईल व्यावसायिक मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडले असून गेल्या दोन महिन्यात पन्नासहून अधिक कोटींचे नुकसान झाले आहे. मोबाईल सध्यातरी जीवनावश्यक वस्तू बनली असून मोबाईल व्यवसाय सुरू करण्याची लवकर परवानगी शासनाने दिल्यास अनेक अडचणी दूर होतील.

– विजय अहुजा, सहसचिव नागपूर मोबाईल डिलर्स असोसिएशन.