03 December 2020

News Flash

दिघोरीत रात्रभर ‘राडा’, तरी पोलीस अनभिज्ञ! 

गुन्हेगार दत्तक योजनेचा फज्जा

(संग्रहित छायाचित्र)

मंगेश राऊत

कुही परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडापूर्वी गुन्हेगारांकडून रविवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकात रात्रभर राडा सुरू होता. तरी याबाबतची माहिती हुडकेश्वर पोलीस किंवा गुन्हे शाखेला कशी मिळाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत असून गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात शहर पोलीस कमी पडत असल्याची चर्चाही पोलीस वर्तुळात सुरू आहे.

राहुल श्रावण लांबट (२७) रा. भांडेवाडी, निशांत प्रशांतराव शाहकर (२३) रा. शक्तीमातानगर, खरबी रोड आणि जागेश्वर ऊर्फ बाळू संतोषराव दुधनकर (३३) रा. निलेमलनगर, नरसाळा अशी दुहेरी हत्याकांडातील आरोपींची तर कुणाल सुरेश चरडे (२९) आणि सुशील सुनील बावणे (२४) दोन्ही रा. दिघोरी अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघेही वर्षभरापूर्वी ठवकर टोळीचे सदस्य  तर आरोपी विजय मोहोड टोळीचे नंबरकारी आहेत. या टोळ्यांमध्ये नेहमीच खडाजंगी सुरू होती. रविवारी रात्री दिघोरी चौकातील एका प्रसिद्ध पानठेल्यावर सुशील बावणे व कुणाल चरडे उभे होते. तेथे बाळू पोहोचताच त्याला शिवीगाळ करू लागले. त्यानंतर बाळू  घरी गेला व तलवार घेऊन चौकात आला. तोपर्यंत सुशील व कुणाल निघून गेले होते. बाळू तलवार घेऊन चौकात त्यांना शोधत होता. त्यामुळे चौकातील सर्व पानठेले व दुकान बंद झाले. नेहमी गजबजलेला चौक अचानक शांत झाल्यानंतरही शहर पोलिसांना काहीच माहिती मिळाली. त्याच्या काही तासांनी सुशील  व कुणाल  बाळूच्या घरासमोर गेले. तेव्हा बाळू त्यांना संपवण्याच्या उद्देशाने तलवार घेऊनच घराबाहेर पडला. पण, कुणाल व सुशील यांनी तडजोडीशी भाषा वापरल्याने त्याने तलवार घरात ठेवली. या प्रकाराची माहिती मिळताच बाळूचे दोन साथीदार त्याच्या घरी पोहोचले. त्यांनी तडजोड करण्यासाठी कुणाल व सुशील यांना बळजबरीने कारमध्ये बसवून उमरेड मार्गावरील डोंगरगाव शिवारात नेले व येथे त्यांचा खून केला. शहर पोलिसांच्या हद्दीत जवळपास पाच तास हा राडा सुरू असताना ‘स्मार्ट पोलिसिंग’चा दावा करणाऱ्या पोलिसांना मात्र यातले काहीच कळले नाही. हुडकेश्वर पोलीस, गुन्हे शाखा पोलीस नेमके काय करीत होते, हा प्रश्न आता विचारला जात आहे. बाळूविरुद्ध तीन खुनांसह एकूण पाच गुन्हे तर  इतर आरोपी व मृतांविरुद्धही यापूर्वीचे गंभीर गुन्हे आहेत. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाकडून आरोपी दत्तक योजना राबवण्यात येते. या आरोपींची जबाबदारी सांभाळणारे पोलीस कर्मचारी, दिघोरीचे बिट बघणारे पोलीस हवालदार, पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक इतके अनभिज्ञ कसे, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

दारू, जुगार, तडीपारांमध्येच गुन्हे शाखा ‘खुश’

हे हत्याकांड कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले तरी मृत व आरोपी हे शहरातील कुख्यात गुंड आहेत, याची माहिती सोमवारी सकाळपासून समाजमाध्यमांवर पसरली. त्यानंतरही शहर पोलीस दलाला आरोपींना पकडता आले नाही. अखेर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय शिताफीने आरोपी जेरबंद केले. शहरात गुन्हे शाखेचे पाच युनिट असून प्रत्येक युनिटचा प्रमुख पोलीस निरीक्षक आहे. त्याशिवाय त्यांच्या हाताखाली सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि शेकडो कर्मचाऱ्यांची फौज असताना आरोपी शहर पोलिसांना न सापडणे, हे शहर पोलीस दलाचे  अपयश आहे. गेल्या काही दिवसांची गुन्हे शाखेची कामगिरी अतिशय सुमार असून गुन्हे शाखा केवळ दारू, जुगार आणि तडीपार पकडण्यातच खुश असल्याचे दिसते. शहरातील खुनांच्या घटनांमधील बहुतांश आरोपींनाही ग्रामीण पोलीस ठाण्यातूनच अटक होत असल्याचेही दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 1:35 am

Web Title: fight was going on all night at dighori chowk on sunday night abn 97
Next Stories
1 गृहजिल्ह्य़ातच ऊर्जामंत्र्यांविरुद्ध आंदोलनाची तयारी
2 सावधान..करोना पुन्हा वाढतोय!
3 मेडिकलमध्ये ‘सीबीसी’ तपासण्या बंद
Just Now!
X