नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना; प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार

करोना विषाणूचा विळखा दिवसागणिक वाढत असतानाच करोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी ‘कोविद-१९’ या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकारशी संलग्न ‘एचएलएल लाइफके अर लिमिटेड’ कं पनीने हे अ‍ॅप तयार के ले आहे. ही ऑनलाइन सेवा देशभर लागू केली तर प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो.

सध्या बहुतेक जण संचारबंदी, टाळेबंदीमुळे घरांतच बसून असतात. बाहेर बहुतेक खासगी दवाखाने बंद अशी स्थिती आहे. अशा वेळी सर्दी, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळल्यास काय करायचे? येथे अ‍ॅपची मदत घेता येऊ शकते. या अ‍ॅपमध्ये चार विभाग असून पहिल्या विभागात वैयक्तिक माहिती, ज्यात संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी, पत्ता यांचा समावेश असेल. दुसऱ्या विभागात खोकला, ताप अशी माहिती, तिसऱ्या विभागात ती व्यक्ती परराज्यात, परदेशात फिरून आली आहे का आणि चौथ्या विभागात ती व्यक्ती करोनाबाधिताच्या संपर्कात आली आहे का ही माहिती भरायची आहे. ही संपूर्ण माहिती अंतर्भूत के ल्यानंतर लगेच ती महापालिके च्या नियंत्रण कक्षातील डॅशबोर्डवर दर्शवली जाईल. यातील गंभीर लक्षणे नमूद केलेल्या प्रकरणांवर प्रामुख्याने लक्ष जावे, याकरिता ती लाल रंगाच्या विभागात दर्शवली जातील. अशा व्यक्तींशी महापालिके ची वैद्यकीय सेवा प्राधान्याने

संपर्क साधेल व त्यानंतर त्यांच्यावरील उपचाराची दिशा ठरवली जाईल, अशी ही संपूर्ण संकल्पना आहे.

नागपूर महापालिकेचे दहा विभाग असून प्रत्येक विभागात एक डॉक्टर असून दहा विभागांतील ३८ वॉर्डाकरिता ३८ चमू तैनात आहेत. त्यामुळे नागपूरकरांना घरबसल्या त्यांच्या आरोग्याच्या शंकेचे निरसन करून घेता येणार आहे. शिवाय या अ‍ॅपच्या माध्यमातून करोनाच्या संशयित रुग्णांचा छडा लावणेही सोपे होणार आहे.

२४ तासांत १७४ जणांना लाभ

या अ‍ॅपचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आल्यानंतर २४ तासांत १७४ जणांनी त्याचा लाभ घेतला. त्यातील १७० जणांमधील करोनाविषयक लक्षणे ही साधारण होती. तर तीन जणांमध्ये ती थोडी अधिक आढळून आली. त्यांना रुग्णालयात आणण्याची गरज नव्हती, त्यामुळे त्या ठिकाणीच त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास अडथळा अशी लक्षणे असलेल्यांनीच या अ‍ॅपवरून संपर्क साधावा. अ‍ॅपमध्ये महापालिके च्या नियंत्रण कक्षाचादेखील संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतात या प्रणालीचा वापर करता येणार आहे.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, नागपूर महापालिका.