अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महाराष्ट्रात चित्रपट आणि मालिकांची निर्मिती झाली असली तरी राज्याबाहेर इतर भाषांमध्येही ती व्हावी, अशी अपेक्षा  ‘शिवपुत्र संभाजी महाराज’ महानाटय़ात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

लोकसेवा प्रतिष्ठान सेवाभावी संस्थान आणि मोहन मते मित्र परिवाराच्यावतीने २२ ते २८ डिसेंबर दरम्यान रेशीमबाग मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी महाराज’ या महानाटय़ाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने  डॉ. कोल्हे नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

संभाजी महाराजांचे चरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून या महानाटय़ाची निर्मिती करण्यात आली. हे केवळ महानाटय़ नाही तर त्यात महाराष्ट्रातील मातीचा संस्कार आहे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यात त्याचे प्रयोग करण्याचा मानस आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १३६ प्रयोग झाले. विदर्भात नागपुरात होणारा पहिलाच प्रयोग आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. तरुण पिढीला महापुरुषांच्या जीवनावरील नाटकाला गर्दी करतो.  दूरचित्र वाहिनीवर  सुरू असलेल्या मालिकांमुळे घराघरात संभाजी पोहोचले असले तरी या महानाटय़ातून त्यातील वेगळेपणा प्रेक्षकांना बघता येईल, असे कोल्हे म्हणाले.

‘जाणता राजा छत्रपती’ हे नाटक हिंदीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, त्याला वेळ आहे. महानाटय़ाची संकल्पना गेल्या काही दिवसात बदलली आहे. मुगले आझमनंतर आणखी बदलेल. यात खूप काही करण्यासारखे आहे. थ्रीडी प्रोजेक्शनवरून गड दाखवण्याचाही प्रयत्न आहे, असे कोल्हे म्हणाले. सध्या चित्रपट व मालिकांमध्ये व्यस्त असल्यामुळे राजकारणात जाण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार मोहन मते, माजी महापौर प्रवीण दटके, संजय खुळे उपस्थित होते.

१३० फुटाचा रंगमंच

महानाटय़ासाठी रेशीमबाग मैदानावर १३० फुटाचा रंगमंच उभारला जाणार आहे. ८० फूट लांब व ५५ फूट उंच किल्ल्याची फिरती प्रतिकृती साकारली जाणार आहे. हत्ती, घोडे, उंट बैलबंडी यांचा नाटकात समावेश  आहे. लढाईतील तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, १८ फूट जहाजाचा वापर करून किल्ले जंजिराची मोहीम  महानाटय़ात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.