विविध वयोगटातील रुग्णांसाठी आहार मात्रा निश्चित; प्रथिनांची गरज असलेल्यांना मांसाहार देणार

महेश बोकडे, नागपूर</strong>

विलंबानेच का होईना सार्वजनिक आरोग्य खात्याने शासकीय रुग्णालयांतील विविध वयोगटातील (शिशूंपासून वृद्धांपर्यंत) रुग्णांसाठी किती आणि कोणता आहार द्यावा, याबाबत निकष निश्चित केले आहेत. प्रथिनांची गरज असलेल्या रुग्णांना मांसाहार देण्याची शिफारस केली आहे. शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या मांसाहाराला कात्री लावण्यात आल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते हे येथे उल्लेखनीय.

नवजात शिशूंना प्रथम सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान, ७ ते ९ महिन्यापर्यंत स्तनपानासोबत सोजी, तांदळाचा रवा, मूगडाळ, पालेभाजी, पपई किंवा हंगामी फळ, दूध, तेल, साखर किंवा गूळ, प्रथिने असलेले थोडे घट्ट पदार्थ, १० ते १२ महिन्यांच्या शिशूला मृद आहार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुधाची एलर्जी असलेल्या बाळाला सोया दूध फायद्याचे आहे. स्तनपान उपलब्ध नसलेल्या तीन महिन्यापर्यंतच्या शिशूला ६०० मिलि. दूध तर ४ ते ६ महिन्यांच्या शिशूला ७०० मिलि. दूध द्यावे. सात ते बारा महिन्यांच्या बाळाला सोजीसह इतर थोडे घट्ट पदार्थ देता येतील.

१ ते १२ वर्षांच्या बालरुग्णांना सकाळी  गहूपीठ, तांदूळ, ब्रेड, पोहे, रवा, सोजी, मुरमुरा, लाह्य़ा, डाळ, उसळ, दालिया, हिरवी पालेभाजी, फळभाजी, कंद भाजी, मौसमी फळ, साखर, गूळ, खाद्यतेल, मसाले, मीठ, प्रथिनेयुक्त पदार्थ निश्चित वेळेत द्यावे, मांसाहार करणाऱ्यांना वयानुसार मांस, मासे, दुपारच्या जेवणात डाळी ऐवजी आठवडय़ातून दोन दिवस अंडी  देता येतील.  उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यानुसार मीठ द्यावे. १ ते २ वर्षांच्या बालकांना स्तनपान सुरू ठेवण्याबाबत मातांना सल्ला देण्याच्याही सूचना आहेत.

कर्करुग्ण, जळीत रुग्णांसाठी आहार

कर्करुग्ण आणि जळीत रुग्ण मांसाहार घेणारे असतील तर  त्यांना दूध आणि अंडी, पपई आणि केळाचा गर, गहू, साखर, कडधान्ये, फळभाज्या, तेल आवश्यक मात्रेत द्यावे.  हलक्या आणि संपूर्ण आहारात शेंगदाणे, गुळाचा लाडूही फायद्याचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रौढ व महिलांसाठी

तृणधान्य, गहूपीठ, तांदूळ, ब्रेड, पोहे, रवा, सोजी, डाळ, उसळ, भाज्या, हिरवी पालेभाजी, कंद भाजी, हंगामी फळे, दूध, साखर, गूळ, खाद्यतेल, मसाला साहित्य, अंडी, उसळ, प्रथिने व उष्मांक असलेले पदार्थ वेगवेगळ्या वेळेत वैद्यकीय सल्ल्यानुसार देण्यात यावे. मांसाहाराकरिता ७५ ग्रॅम मांस, मासे, अंडी आठवडय़ातून दोन वेळा दुपारच्या जेवणात डाळी ऐवजी देता येत असल्याचे सांगण्यात आले आहे. गर्भवती व स्तनदा माता, अस्थिरोग ग्रस्तांना, शल्यक्रियेसाठी दाखल रुग्णांना हा आहार काही पदार्थामध्ये थोडा बदल सुचवून द्यावा.

मनोरुग्णांसाठी आवश्यक

मनोरुग्णांना तृणधान्य, गहूपीठ, तांदूळ, ब्रेड, पोहे, रवा, सोजी, डाळ, उसळ, हिरवी पालेभाजी, फळ भाजी, हंगामी फळे, दूध, साखर, दूध, खाद्यतेल, मसाला साहित्य, चहापत्ती, शेंगदाणे आणि मांसाहार करणाऱ्यांना ७५ ग्रॅम मांस, मासे, अंडी आठवडय़ातून दोन वेळा दुपारच्या जेवणात डाळी ऐवजी देता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे.