शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतही गोंधळ घातला. तसंच विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. सुरूवातीला झालेल्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आताच आला का?” असा सवाल पाटील यांनी विरोधकांना केला.

“घोषणाबाजीची तुम्हाला सवय राहिलेली नाही. पुढील पाच वर्ष तुम्हाला आता तेच करायचं आहे. पुढचे उरलेले दिवस तुम्हाला याचा सरावच करायचा आहे,” असा टोला पाटील यांनी यावेळी विरोधकांना हाणला. “गेली पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. परंतु तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका आताच आला का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा आलेला पुळका हा खोटा आहे, म्हणूनच तुम्ही आज विरोधी पक्षात बसला आहात. सभागृहाचं कामकाज शांतपणे चालू द्यावं,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

“सभागृहात सर्वांनी संयमानं वागलं पाहिजे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं ६ हजार ६०० कोटी रूपयांची मदत केली आहे. केंद्रानंही मदतीचे पैसे लवकरात लवकर दिले पाहिजे. केंद्राकडून मदत आली नसतानाही सरकारनं मदत केली आहे,” असं पाटील म्हणाले. तसंच यावेळी केंद्रानंही शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे त्वरित द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीवरून भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. तसंच सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली जात आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांना जोवर मदतीची घोषणा होत नाही, तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षाकडून घेण्यात आली. तसंच यावेळी भाजपाकडून वेलमध्ये उतरूनही घोषणाबाजी करण्यात आली.