हवामान केंद्रांच्या नोंदीबाबत अलीकडच्या काळात साशंकता व्यक्ती केली जात असतानाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा, या उद्देशाने हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तापमान, पाऊस, अशी माहिती या केंद्रामुळे मोठय़ा प्रमाणावर गोळा होणार असली तरीही केंद्राच्या उभारणीमागे अनेक आव्हानेसुद्धा असणार आहेत.
हवामान केंद्रांची उभारणी करणे सोपे काम नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या परंपरागत हवामान केंद्रे आणि स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदी घेण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धतीवर आधारित असल्याने त्यांच नोंदींमध्येही तफावत आहे. तापमानाच्या नोंदीबाबत सांगायचे तर परंपरागत पद्धतीत काचेमध्ये पारा किंवा अल्कोहोल वापरून नोंदी घेतल्या जातात, तर स्वयंचलित पद्धतीत इलेक्ट्रॉनिक सेन्सर वापरले जाते. त्यामुळे नोंदीत तफावत असली तरीही फार मोठी नाही. तापमान, वारा आणि पाऊस ही नोंद एका पद्धतीत होते, तर दुसऱ्या पद्धतीत जमिनीतील ओलावा किती, हवेतील प्रदूषण किती, याचीही नोंद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्ह्यात हवामान केंद्र उभारले जात असतील तर या दोन्ही नोंदी असणारे सेन्सर या केंद्रात असणे गरजेचे आहे. हवामान केंद्राची सुरक्षितता हेही एक मोठे आव्हान आहे. भारतात हवामान केंद्राचे अनेक घटक चोरीला गेले आहेत. त्यामुळे केंद्रांची उभारणी करताना सुरक्षिततेची काळजीही घ्यावी लागणार आहे. केंद्राचा एक जरी भाग चोरीला गेला तरी त्याच्या दुरुस्तीचा मुद्दा उभा राहणार आहे. नागपूरच्या रडार केंद्राची सध्याची अवस्था अशीच आहे. या केंद्राची उभारणी झाली तरीही त्यातून पाऊस किती, तापमान किती, एवढीच माहिती पुरवली जाणार आहे, पण रडारप्रमाणे येणाऱ्या काळात काय घडेल, याची भविष्यवाणी या केंद्रातून होणार नाही. त्यामुळे गारपीट होणार का, पेरणी करायची की नाही, यासारख्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील? शेतकऱ्यांसाठी नेमकी हीच भविष्यवाणी गरजेची असल्यामुळे त्यासाठी लागणारे वेगळे तंत्रज्ञान या केंद्रात वापरले जाणार का, हे अजूनही निश्चित नाही. सध्या तरी या केंद्रातून मिळणारी तापमान आणि पावसाची माहिती पुण्यातील कृषी खात्यात जाईल, पण तेथून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे आणखी एक मोठे आव्हान आहे.

गेल्या वर्षी १३ लाख शेतकऱ्यांना कृषी सल्ले जात होते. यंदा तो आकडा वाढला आणि ५० लाखाच्या घरात गेला. आता हवामान केंद्र वाढणार असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. सध्या जिल्हास्तरावर हवामानाचा अंदाज व्यक्त होत आहे. काही महिन्यानंतर ब्लॉकलेव्हलला तो दिला जाणार आहे. सुरुवातीला वर्धा, वाशिम, गोंदिया, सातारा, धुळे ,औरंगाबाद या जिल्ह्य़ात ब्लॉकलेव्हलला हवामान अंदाज दिला जाणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हवामान केंद्राची उभारणी हे एक सकारात्मक पाऊल आहे. जेवढी जास्त केंद्रे त्यावरून किती पाऊस पडला, किती तापमान होते ही अधिक माहिती गोळा होईल. यावरून कृषी सल्ल्यांमध्ये सुधारणा करता येतील आणि त्यावरून शेतपिकांचे होणारे नुकसान थांबवता येईल. किती सिंचन करायचे, किटकनाशके किती वापरायची, हे अधिकाधिक हवामान केंद्रांवरून गोळा होणाऱ्या अधिकाधिक माहितीवरून शेतकऱ्यांना सांगता येईल. कारण, सध्या हा अंदाज शेतकऱ्यांना नसल्यामुळे अधिक सिंचन किंवा अधिक किटकनाशकांच्या वापरामुळे शेतपिकाला नुकसान होत आहे.
-अक्षय देवरस,
युवा हवामान अभ्यासक