हातात केवळ सव्वा वर्षांचा अत्यल्प वेळ

महापौरपदाच्या उर्वरित अडीच वर्षांच्या कार्यकाळाची भाजपने सव्वा-सव्वा वर्षे अशी वाटणी केल्याने नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांना त्यांच्या अल्प कार्यकाळात महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

संदीप जोशी यांची महापौरपदी निवड झाल्याने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जोशी स्वत: तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांनी पक्षात संघनात्मक पातळीवर आणि महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. गेली तीन वर्षे महापालिकेतील सत्तासूत्र ही त्यांच्याच हाती होती. त्यांना प्रशासन आणि महापालिका कार्यप्रणालीची पुरेशी कल्पना आहे. शहरातील समस्या आणि सध्या सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी ते अवगत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या अवघड आहे. त्यातून मार्ग काढून अल्पकाळात गाडी रुळावर आणण्याचे मोठे आव्हान जोशी यांना पेलावे लागणार आहे.

शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाईने तोंड वर काढले होते. सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. सिमेंट रस्त्यांच्या दर्जाबाबत असलेला संशय, अर्धवट अवस्थेत असलेली कामे यामुळे महापालिकेवर सर्वसामान्य नागपूरकर नाराज आहेत. महापालिकेला करापासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने राज्य व केंद्र शासनावरील अवलंबिता वाढली आहे. मागील काळात राज्यात भाजपचेच सरकार असल्याने आणि खुद्द देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याने महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निवाडा होत होता. यात आर्थिक प्रश्नांचाही समावेश होता. जोशी यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना आघाडीचे सरकार आलेले असेल. या नव्या सरकारशी जुळवून घेतानाही जोशी यांना तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

भांडेवाडीमध्ये सुरू असलेला प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. नागनदी स्वच्छता व सौंदर्यीकरण अभियानासह आदी प्रकल्पांची कामे सुरू झाली नाहीत. शहरातील मैदाने, उद्याने विकसित करून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण  झालेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे या सर्व समस्यांवर मात करीत सव्वा वर्षांच्या काळात शहराच्या विकासासाठी संदीप जोशी कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नगरसेवक ते महापौर

नगरसेवक ते महापौर या प्रवासात संदीप जोशी यांनी महापालिकेतील स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेता अशी विविध महत्त्वाची आणि मानाची पदे भूषवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेली नाळ, कार्यकर्ता, कुशल प्रशासक आणि समाजसेवेच्या विविध आघाडय़ांवर  सतत कार्यरत राहिले. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची प्रचाराची धुरा जोशी यांच्याकडे होती. २००२ मध्ये राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केल्यानंतर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७, २०१२ आणि सन २०१७ मध्ये सलग निवडून आले. चारवेळा नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी सन २०१०-११ आणि  २०११-१२ असे सलग दोन वर्ष स्थायी समितीचे सभापती म्हणून कार्यभार सांभाळला. २०१० ते २०११ या काळात नासुप्रेच विश्वस्त म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली. २०१२ ते २०१७ साली तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्यानंतर सत्तापक्ष नेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २०१७ च्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा सत्तापक्ष नेता म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती.

महापौर निवडणूक क्षणचित्रे

  •  महापौर निवडणुकीच्या वेळी सेना नगरसेवक अनुपस्थित
  • भाजपचे बाल्या बोरकर  आजारी असल्याने गैरहजर
  • पक्षातून निलंबित सदस्य सतीश होले, काँग्रेसचे बंटी शेळके, गार्गी चौपडा, रश्मी धुर्वे, जिशान मुमताज आणि अपक्ष नगरसेविका आभा पांडे अनुपस्थित

महापौर व उपमहापौरांची

  • निवड होताच टाऊन हॉलच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांचा विजयोत्सव
  •  नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांची  शिवाजी पुतळ्यापर्यंत विजयी मिरवणूक
  • उपमहापौरपदासाठी संधी दिल्याने मी पक्षाची आभारी आहे. शहराच्या विकासात जे काही योगदान देता येईल त्यासाठी प्रयत्न करेन.

– मनीषा कोठे, नवनिर्वाचित उपमहापौर.