अभ्यासकांच्या पाहणीतील निष्कर्ष

उष्ण हवामान आर्थिक नुकसानीसाठी कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील अभ्यासकांनी केलेल्या पाहणीतून पुढे आला आहे. उष्ण हवामानात कामगारांची कार्यक्षमता कमी होते आणि वातानुकूलित हवामान ही समस्या सोडवू शकत नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेचे दक्षिण आशियाचे संचालक सुदर्शन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतातील कामगारांच्या उत्पादकतेचे विश्लेषण केले आहे. या संपूर्ण अभ्यासासाठी त्यांनी भारतातील सुमारे ७० हजार कारखान्यांची पाहणी केली. कामगार केंद्रित आणि स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया या दोन्हीचाही अभ्यास केला. सरासरी तापमानात  तीन टक्क्याने उत्पादन कमी झाल्याचे आढळून आले. उष्ण वर्षांमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे तसेच हवामानावर नियंत्रण मिळवणाऱ्या कारखान्यांमधील कामगार अधिक उत्पादनक्षम असल्याचेही त्यांना दिसून आले.

२७ अंश सेल्सिअस तापमानात कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची उत्पादनक्षमता एक अंश सेल्सिअसमागे चार टक्क्यांनी कमी झाल्याचे तसेच पोलाद उद्योगात  स्वयंचलित यंत्रावर काम करताना उत्पादकता कमी होत नसल्याचे दिसून आले. दहा दिवसांच्या तापमानात सरासरी एक टक्का वाढ होत असेल तर कामगारांच्या अनुपस्थितीचे प्रमाण हे पाच टक्के असल्याचे त्यांना आढळले.

शीतयंत्रणेचा वापर केला तरीही कामगारांच्या अनुपस्थितीची समस्या सुटू शकत नाही. कामगार कमी असतील तर त्याचा कामावर आणि परिणामी  उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे साहाजिकच अर्थव्यवस्था कोसळते, असा निष्कर्ष  अभ्यासातून काढण्यात आला आहे.

जगभरातील देशांमध्ये उत्पादन कमी होण्याचा संबंध विलक्षण उष्ण हवामानाशी जोडला जातो. उष्णतेशी संबंधित आजारामुळे पीक कमी होते. शरीराचे तापमान वाढल्यावरही काम करणे कठीण होते. भारत असो किंवा अमेरिका किंवा इतर देशातही मानवी शरीरक्रियाविज्ञान हे सारखेच असते. उष्ण तापमान आणि कमी उत्पादनक्षमता यातून हवामान बदलाचे काय परिणाम मोजावे लागू शकतात याची प्रचिती येते.   – अनंत सुदर्शन, दक्षिण आशियाचे संचालक, ऊर्जा धोरण संस्था, शिकागो विद्यापीठ