ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमातील ‘अनिल’वर गेल्या बारा दिवसांपासून नागपूरच्या मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. ‘अनिल’च्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याने त्याला आज, बुधवारी त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी अनिलच्या सुटीचे कागदपत्र तयार करण्याकरिता मदत केली. सोबत महापालिकेकडून अनिलला आश्रमात परत जाण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. अनिलसोबत शंकरबाबा पापळकरही उपस्थित होते.
मुंबईच्या पेडर मार्गावर २००१ मध्ये सापडलेल्या मतिमंद अनिलचा शंकरबाबा त्यांच्या स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृह, वझ्झर, जि. अमरावती येथे सांभाळ करीत आहेत. अनिलच्या मानेत १ मार्च २०१६ रोजी दुखत असल्याने त्याला अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. अनिलच्या मेंदूत काही गाठी आढळल्याने त्याला गंभीर अवस्थेत तातडीने नागपूरच्या मेडिकलमध्ये १० मार्च २०१६ च्या सुमारास हलवण्यात आले. येथे काही औषधे उपलब्ध नसल्याने ते त्यांना बाहेरून आणायला सांगण्यात आले. सोबत काही तपासण्याही बाहेरून लिहून दिल्या गेल्या.
ही माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रमेश पराते यांना कळताच त्यांनी त्वरित औषधशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सगळा उपचार मोफत करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी नमुने तपासण्याकरिता आधीच दिल्या गेलेल्या खासगी तपासणी केंद्राला विनंती करून अनिलच्या तपासणीचे शुल्कही माफ केले गेले. अधिष्ठात्यांनी स्वत: हातात टेथॅस्कोप घेत वार्डात अनिलला तपासून औषधांमध्ये काही बदलही सुचवले. अनिलने औषधांना चांगला प्रतिसाद दिल्याने त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. दरम्यान, अनिलला बघण्याकरिता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बढोले हेही मेडिकलला भेट देऊन गेले होते. त्यांनी मेडिकलच्या वतीने दिल्या गेलेली आरोग्य सुविधेची प्रशंसा केली होती. शेवटी अनिलला आज, बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अनिलला घेण्याकरिता शंकरबाबा पापळकर स्वत आले होते. अनिलला परत आश्रमात सुखरूप जाता यावे म्हणून नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. तत्पूर्वी, डॉक्टरांकडून अनिलला पुढे द्यायच्या औषधांबाबत शंकरबाबा पापळकर यांना समजावण्यात आले. एक महिन्यांनी पुन्हा अनिलला दाखवण्याकरिता आणण्याचा सल्ला देण्यात आला. याप्रसंगी मेडिकलच्या वतीने औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वृंदा सहस्त्रभोजनी, डॉ. विनय पंचेलवार उपस्थित होते.