व्हॉट्सअ‍ॅप समूहावरील प्रकार अंगलट

मंगेश राऊत, नागपूर</strong>

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर एका व्हॉट्सअ‍ॅप समूहावर मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या वकिलाविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड. मुकुल फडके असे आरोपी वकिलाचे नाव आहे.

अ‍ॅड. आदिल मोहम्मद शफी मोहम्मद (२९) रा. भालदारपुरा यांच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. अयोध्या प्रकरणावर  ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. निकालापूर्वी देशात शांतता राखण्यासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणांकडून मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करण्यात आली होती. शिवाय व्हॉट्सअ‍ॅप समूहावर किंवा इतरत्र नारेबाजी करून धार्मिक भावना न दुखावण्याचे आवाहन सुरक्षा यंत्रणा व समाजातील विविध घटकांकडून करण्यात आले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबरला ९९२३४४५६७४ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने जिल्हा न्यायालयातील वकिलांच्या ‘प्रिस्टीन लॉयर्स’ या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. समूहाचे अ‍ॅडमिन अ‍ॅड. महेश मुरुगन हे असून त्यांचे निधन झाले आहे. या समूहावर एकूण २३८ वकील सदस्य आहेत. संबंधित क्रमांकावरून टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची माहिती घेण्यात आली. त्यावेळी तो क्रमांक अ‍ॅड. मुकुल फडके यांचा असल्याचे समजले. अ‍ॅड. आदिल मोहम्मद यांनी मुकुल फडके यांच्या फेसबुक पेजलाही भेट दिली असता भावना दुखावणारे व समाजात तेढ निर्माण होईल, असे अनेक संदेश टाकलेले होते.  त्यांनी तक्रारअर्जात वेगवेगळे संदेश व फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टसह सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर पोलिसांनी भादंविच्या १५३-अ, ब, २९५-अ, ५०४, ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. यासंदर्भात सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.