पोलिसात तक्रार दाखल, पण कारवाई नाहीच

स्वतला बजरंग दलाचा कार्यकर्ता व गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या जिल्ह्य़ातील कुही तालुक्यात मौजा सिल्ली येथील दत्तुराम जिभकाटेविरोधात तक्रार दाखल होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आणि प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीच कारवाई केली नाही. जिभकाटे गावभर मोकाट फिरत असताना ना प्रशासनाकडून त्याला विचारणा होत आहे ना कारवाई केली जात आहे.

गोसेवेच्या नावाखाली गाईंची विटंबना होत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यावर जिल्ह्य़ातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिभकाटेविरोधात कुही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

गोसंवर्धनासाठी गोळा केलेल्या गाईंच्या देखभालीकडे गोसेवक म्हणवणाऱ्या दत्तुराम जिभकाटेने दुर्लक्ष केल्यामुळे शंभरावर गाई मृतावस्थेत असल्याचे समोर आले होते. शिवाय, मृत झालेल्या गाई तो तलावात फेकत असे. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी जिभकाटेवर कारवाई करून तेथील गाई चांगल्या गोशाळेत पाठवल्या जातील अशी अपेक्षा प्रशासनाकडून होती. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून तेथे रोज गाई मरत असूनही प्रशासन त्याविरोधात कुठलीच कारवाई करीत नसल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर कुही तालुक्यातील बजरंग दलाचे निखिल येळणे आणि अरविंद अवचट यांच्या नेतृत्वाखाली कुही पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन या कार्यकर्त्यांना दिले होते. बजरंग दलाच्या नावाचा दुरुपयोग करून गोरक्षक म्हणून गाई विकण्याचा व्यवसाय जिभकाटे करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी करून तशी तक्रार दिली होती.

दत्तुराम जिभकाटेची गावात दहशत असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे असलेल्या एका रखवालदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती, त्यामुळे त्याच्याविरोधात गावातील कोणी बोलत नसल्याचे निष्पन्न झाले.

दहा दिवसांनीही गावात गाईंची स्थिती तशीच असून तेथे विश्व हिंदू परिषदेचा एकही कार्यकर्ता अद्याप पोहोचलेला नाही. स्थानिक बजरंग दल कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करूनही कुही पोलिसांनीही कारवाई केली नसल्याचे निखिल येळणे यांनी सांगितले.

दत्तुराम जिभकाटे हा गोरक्षणाच्या नावाखाली गोशाळा चालवित असला तरी तरी त्याच्याविरोधात कुणीही आजपर्यंत तक्रार केलेली नव्हती. मात्र, आता तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे. जिल्हा परिषद त्या संदर्भात कारवाई करू शकत नाही. महसूल विभागाच्या जमिनीवर जिभकाटेने अतिक्रमण केले असताना विभागाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे.  डॉ. शिवाजी सोनसरे, जिल्हा परिषद सदस्य, कुही