एक महिन्यातील तिसरी घटना; आगीची व्याप्ती १०० हेक्टरवर

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रकल्पाला गती येत असतानाच अवघ्या महिनाभरात तीनदा आग लागल्याने प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वी १० डिसेंबरला घटक क्रमांक दोनमध्ये लागलेल्या आगीत सुमारे दोन हेक्टर जंगल जळाले होते, तर दोन दिवसांपूर्वी मंगळवारी बचाव केंद्राजवळ लागलेल्या आगीत चार हेक्टर जंगल जळाले होते. आज गुरुवारीदेखील याच भागात लागलेल्या आगीत ६० ते ६५ हेक्टर जंगल जळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात १०० हेक्टर जंगल जळाल्याची माहिती आहे.

आज, दुपारच्या सुमारास गोरेवाडय़ाला आग लागली आणि एकच धावपळ उडाली. प्रशासनाने तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. त्यांचे एक वाहन आणि कर्मचारी तसेच गोरेवाडय़ाचे सुमारे ४० ते ५० कर्मचारी आग विझवण्याच्या कामात लागले. सुमारे तासाभराने आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत सुमारे १०० हेक्टर जंगल जळाले होते.

जानेवारीच्या मध्यान्हात साधारपणे जंगलात जाळरेषांची कामे केली जातात, पण गोरेवाडय़ाला जंगलात अजूनपर्यंत ही कामे पूर्ण झालेले नाही. या संपूर्ण परिसरात चार ते पाच फूट गवत वाढलेले आहे आणि ते काढण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी वारंवार गोरेवाडा प्रशासनाला सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अधिवेशनकाळात मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव व वनखात्याचे माजी प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी याठिकाणी पाहणी केली. त्यांनी दिलेल्या सूचनानंतर येथे गवत काढण्यास सुरुवात झाली. गवत काढण्याकरिता प्रत्येकी ४० ते ४५ हजार रुपयांचे आधी चार आणि अलीकडेच दोन यंत्र घेण्यात आले होते हे विशेष. तरीदेखील गवताची कापणी झाली नाही.

काही महिन्यांपूर्वीच मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जायला हवा, असे आदेश दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर आगीचे हे तांडव घडून येत असल्याने प्रशासनाचा दुर्लक्षितपणा गोरेवाडय़ाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

यापूर्वी लागलेल्या आगी

दोन दिवसांपूर्वी, मंगळवारी गोरेवाडय़ातील बचाव केंद्राजवळ लागलेल्या आगीत सुमारे चार हेक्टर जंगल जळाले. ही आग बचाव केंद्राच्या आत पोहोचली असती तर त्याची झळ तेथील प्राण्यांनाही बसली असती. तब्बल महिनाभरापूर्वी याच ठिकाणी लागलेल्या आगीत दोन हेक्टर जंगल जळाले. सुमारे अकरा महिन्यापूर्वी लागलेल्या आगीत देखील दहा हेक्टर जंगल जळाले होते. आगीवर लवकर नियंत्रण मिळवले म्हणून ठीक, अन्यथा गोरेवाडय़ात वणवा भडकण्यास वेळ लागला नसता. हीच आग जर सफारीच्या मार्गात लागली असती तर सुरक्षा भिंतीमुळे पर्यटकांना बाहेर पडणेही कठीण झाले असते. गेल्या वर्षभरापासून याठिकाणी सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत.

जाळरेषांची कामे सुरू झाली आहेत आणि गवतही कापण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात काठीयावाडी आणि इतर लोकांना या परिसरात घुसखोरीवर र्निबध आणले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी लागलेली आग ही त्याचाच परिणाम असावा असे वाटले होते. मात्र, आज लागलेल्या आगीनंतर आगीचे नेमके कारण शोधण्यात येईल.

नंदकिशोर काळे, वभागीय वनाधिकारी, गोरेवाडा