कोटय़वधी रुपयांचे नुकसान

नागपूर :  मंगळवारी मध्यरात्री  महालगाव कापसी परिसरात असलेल्या तीन  लाकूड गिरण्यांना (सॉ मिल) आग लागली. त्यात कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. आठ आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

महालगाव परिसरात मोफतलाल नत्थू पटेल, प्रदीप पटेल व जलाराम इंड्रस्टीज यांच्या आरामशीन व लाकडाचा कारखाना आहे. या तीनही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लाकडाचा साठा होता. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोफतलाल पटेल यांच्या आरामशीनला आग लागल्यानंतर काही वेळात आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या दोन्ही गिरण्या आगीच्या विळख्यात सापडल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या गिरण्यांमध्ये लाकडाचे अनेक मोठे ओंडके  ठेवलेले होते. टिनाच्या शेडमध्ये ठेवलेल्या या ओंडक्यांसह दोन सॉमशीनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच  या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लकडगंज केंद्रातून दोन तर कळमना, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट, सिव्हिल लाईन्स आणि त्रिमूर्ती नगरच्या अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी एक असे आठ आगीचे बंब तातडीने पाठवण्यात आले. पाच ते सहा तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागल्याचे रात्रीच परिसरातील लोकांची गर्दी झाली. या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या कामात सतत अडचणी येत होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वाखाली मोहन गुडधे व तुषार बाराहाते आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अग्निशमन यंत्रणा नाही

विशेष म्हणजे, या तीनही गिरण्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नव्हती. शिवाय, इतक्या विस्तारित  परिसरात आगीसारख्या आपत्कालीन घटनेत उपयोगी येईल असा पाणीसाठाही नसल्याचे अग्निशमन दलाच्या पथकाने स्पष्ट केले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास लागलेली आग पहाटेपर्यंत धगधगत होती. लाकडासारख्या ज्वलनशील कच्च्या मालावर काम होत असलेल्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणेसारख्या पायाभूत सुविधा का नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आग कशामुळे लागली याचा पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा शोध घेत  आहेत.