भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवात दहा नवजात मुलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांना अग्निशमन अंकेक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद अशी तीन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालये, तर मुंबईत मुंबई महापालिकेचे एक दंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांत रोज मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. नागपूरच्या दंत महाविद्यालयांत तर विदर्भासह शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड येथूनही रुग्ण येतात. हे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व दंत महाविद्यालयातील वर्ग एक ते चापर्यंतच्या कर्मचाऱ्यांसह इतर कायम व कंत्राटी कर्मचारी बघता येथे रोज मोठय़ा संख्येने नागरिकांची ये-जा असते. या सगळ्यांना सुरक्षित वातावरणात उपचार घेता यावेत म्हणून या सर्व महाविद्यालयांचे अग्निशमन अंकेक्षण आवश्यक होते. भंडारा दुर्घटनेनंतर सर्व महाविद्यालयांचे अंकेक्षण होऊन येथे आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय दंत महाविद्यालयांचे तातडीने अग्निशमन अंकेक्षण करण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना दिले आहेत. त्यामुळे येथे आगीसारखी घटना घडल्यास त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे सोपे होईल.

– डॉ. शंकर डांगे, सहसंचालक (दंत), वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई