नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती पेंढरकर यांच्या मालकीच्या मगणा येथील विको लेबॉरेटरीज कारखान्याला रविवारी रात्री आग लागली. आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल दहा बंब बोलावण्यात आले. या आगीत तेथील दोन मजली इमारत जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात प्लॉट क्र. एस-८९ या भूखंडावर विको लेबॉरेटरीजचा कारखाना आहे. येथे सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती केली जाते. याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास आग लागली आणि आग संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी तेथे असलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे समजते. आग विझवण्यासाठी नागपूर महापालिकेचे सहा, हिंगणा अग्निशामक केंद्रातून दोन, वाडी नगर परिषदेतून एक तर कळमेश्वर येथून एक असे एकूण दहा पाण्याचे बंब बोलावण्यात आले होते. आग वेगाने पसरत असल्याने तेथे असलेली दोन माळ्याची इमारत जळून खाक झाली. कारखान्यात मोठय़ा संख्येने वॅक्स व कच्चे अल्कोहोल असल्याने आग अधिक पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला मोठी कसरत करावी लागली. सोमवारी पहाटे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यात कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.