टर्न टेबल लँडरसाठी सहा वेळा निविदा

आग लागण्याच्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यात मुंबई महापालिकेतील अग्निशमन विभाग सुसज्ज केला जात असतानाच उपराजधानीतील महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वषार्ंपासून शहरातील इमारतीसाठी लागणारे ४२ मीटर उंच ‘टर्न टेबल लँडर’ खरेदी करण्याबाबत तब्बल सहा वेळा निविदा काढल्या असताना केवळ निधीअभावी या यंत्र खरेदीसह इतर प्रस्तावही रखडले आहेत.

शहराची लोकसंख्या आणि वाढता विस्तार बघता महापालिकेच्या अग्निशमन विभागात आवश्यक असलेल्या सोयी सुविधांचे प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, राज्य सरकारला त्याचे गांभीर्य नाही.  गेल्या दोन वर्षांत नागपुरात आगीच्या मोठय़ा घटना घडल्या नसल्यामुळे आहे त्या यंत्रणेवर आणि मनुष्यबळावर काम निभावले जात आहे. मात्र येणाऱ्या काळात शहरात एकाचवेळी चार पाच मोठय़ा आगी लागल्या तर महापालिकेजवळ आजघडीला ना पुरेसे मनुष्यबळ आहे ना तेवढी सक्षम यंत्रणा. शहरातील विविध भागात गगनचुंबी इमारतीची संख्या वाढत असताना अशा इमारतीमध्ये आग लागली तर अग्निशमन दलाकडे उंच शिडी नाही. आग विझवण्याच्या यंत्राबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या यंत्राची किंमत ८ कोटीच्या जवळपास आहे. स्थायी समितीकडे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे मात्र केवळ निधी नसल्यामुळे त्यावर समिती आणि प्रशासनाकडून निर्णय घेतला जात नाही.

शहरात आठ अग्निशमन केंद्रे आहेत त्यातील पाच केंद्रांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उर्वरित तीन केंद्रांना मंजुरी देण्यात यावी यासाठी एक वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षभरात त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. एका अग्निशमन केंद्रावर पाच गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे चालक मात्र दोनच आहेत त्यामुळे एखाद्या विभागात आगीची मोठी घडना घडली की अग्निशमन बंब पोहचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना बरीच मोठी कसरत करावी लागते. अनेक गाडय़ांची अवस्था चांगली नसून त्या दुरुस्त करण्यासाठी विभागाने प्रस्ताव दिला असताना त्यावरही कार्यवाही होत नाही. विभागात जवळपास ४० पदे रिक्त असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे, २०१५ संपले तरी पदभरती करण्यात आली नाही. कमी कर्मचाऱ्यांमध्ये शहरातील यंत्रणा सांभाळली जात असताना त्यांना दोन वर्षांपासून पदोन्नतीही दिलेली नाही.

लवकरच निर्णय -राऊत

या संदर्भात अग्निशमन विभागाचे उपसभापती सुधीर राऊत यांनी सांगितले, अग्निशमन विभागात सोयी सुविधा असल्या तरी मनुष्यबळांची कमतरता आहे.  टर्न टेबल लँडरबाबतची फाईल स्थायी समितीकडे मंजुरीसाठी असून संबंधित कंपनीला प्रथम ४ कोटी रुपये देणे आहे. निधी नसल्यामुळे हा प्रस्ताव रखडला असला तरी त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अग्निशमन विभागाचे मुख्य कार्यालय (सेंट्रल फायर ब्रिग्रेड) स्वतंत्र असावे आणि त्याच ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था असली पाहिजे, मात्र महापालिकेत ती व्यवस्था नाही. पुण्यामध्ये अग्निशमन विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे तशीच व्यवस्था नागपुरात करण्यात यावी, त्यासाठी किमान तीन एकर जागेची आवश्यकता आहे.