ऐन हिवाळ्यात आगीने प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय तयार होण्यापूर्वीच या प्रकल्पाला लागलेले आगीचे ग्रहण अजुनही सुटायला तयार नाही. नवीन वर्षांच्या सुरवातीलाच एका महिन्यात तब्बल तीनदा या प्रकल्पात आगीचे तांडव माजले असताना गुरुवार, आठ नोव्हेंबरला गोरेवाडय़ातील युनिट एकमध्ये महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागली. आगीचे स्वरुप मोठे नसले तरीही ऐन हिवाळ्यात लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

गोरेवाडय़ातील इंडियन सफारीचे काम येत्या मार्चपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश आहेत. मात्र, काम अजूनही संथगतीने सुरू आहे. त्यातच प्रकल्पाला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे प्रकल्पाच्या एकूणच कामावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. गवत काढण्यासाठी यंत्र घेण्यात आले तरीही प्रचंड गवत याठिकाणी वाढले आहे. गोरेवाडय़ाच्या संरक्षण भिंतीलगत अनेकदा आगी लागल्या आहेत. गुरुवारी लागलेली आग गोरेवाडा गावाच्या मागील बाजूच्या कक्ष एकमध्ये लागली. या भागात दरवर्षीच आग लागते, कारण गवत वाढले आहे. या बाजूची भिंत लहान असल्याने लोक भिंत ओलांडून येतात.

याठिकाणी कचरा टाकतात. मागील वर्षी गोरेवाडा गावातील नागरिकांना समजावून सांगण्याचा बराच प्रयत्न झाला. त्यांच्यासाठी सफारी घडवून आणली.  तसेच बरेच कार्यक्रम घेण्यात आले. मात्र, नागरिकांनी तेवढयापुरते सहकार्य केले. आता पुन्हा तोच प्रकार त्यांनी सुरू केला. यामुळे एकीकडे प्रशासन त्रस्त असले तरीही गस्तीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ऐन हिवाळ्यात लागलेल्या आगीनंतर उन्हाळ्यात काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

युनिट एकजवळ असलेल्या भिंतीची उंची कमी आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना येथून सहज प्रवेश करणे सोपे जाते. भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आग विझवण्यासाठी ब्लोअरची व्यवस्था गोरेवाडा व्यवस्थापनाकडे आहे. गावकऱ्यांना समजावण्याचे बरेच प्रयत्न झाले तरीही ते लोक याठिकाणी कचरा टाकतात.    – नंदकिशोर काळे, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा