*  गजबजलेल्या गांधीबाग वस्तीत सकाळी थरार
*  जमिनीच्या वादातून हत्या केल्याचा संशय

अतिशय गजबजलेली वस्ती असलेल्या गांधीबाग परिसरात मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका ७४ वर्षीय वृद्धावर बंदुकीतून पाच गोळया झाडण्यात आल्या. या वृद्धाचा उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून पाच एकर शेतीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

एकनाथ धर्माची निमगडे रा. हॉटेल सत्कारजवळ, सी.ए. मार्ग गांधीबाग असे मृताचे नाव आहे. ते आर्किटेक्ट होते. त्यांचा स्वत:चा व्यवसाय असून मोठा मुलगा उज्ज्वल त्यांच्यासोबत काम करायचा. तर लहान मुलगा अनुप वकिली व्यवसायात आहे. त्यांची वर्धा मार्गावर हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट परिसरात साडेपाच एकर शेती आहे. या शेतीवरून हिंदस्थान ट्रॅव्हल्सचे मालक अन्नु सिद्दीकी, आतिक सिद्दीकी, पॉयोनिअर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक अरुण नायर आणि ग्रीन लॅब्रेज नावाच्या कंपनीचे मालक गुप्ता नावाच्या व्यक्तीशी त्यांचा वाद सुरू असून त्यासंदर्भात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे, अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिली.

निमगडे हे दररोज सकाळी पत्नीसह गांधीबागच्या बगिच्यात फिरायला जायचे. मंगळवारी सकाळी ते आपल्या एमएच-३१, एव्ही-२६९ क्रमांकाच्या टीव्हीएस स्कूटीने बगिच्यात फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी सोबत नव्हती.

बगिच्यातून परत येत असताना डागा रुग्णालयाच्या मागील गल्लीने घराकडे जात असताना एकाने पाठलाग केला आणि त्यांच्यासमोर आडवे होऊन त्यांच्यावर बंदुकीतून पाच गोळया झाडल्या. यातील तीन गोळया त्यांच्या हाताला लागल्या. तर एक गोळी त्यांच्या पोटात घुसली. त्यानंतर ते रक्तबंबाळ अवस्थेत गाडीसह जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपी पळून गेला. फटाके फोडण्याचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील एक महिला पहिल्या माळयावरून डोकावली असता एकजण जमिनीवर कोसळला असून दुसरा अ‍ॅक्टिव्हासारख्या काळया रंगाच्या गाडीने चेहरा बांधलेल्या अवस्थेत पळून जाताना दिसला. त्यानंतर ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्याच भाग गस्तीवर असणारे पोलिसांचे एक वाहन घटनास्थळी पोहोचले आणि निमगडेंना मेयो रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, दुपारी १२ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपत्तीच्या वादातून गुंडांना सुपारी देऊन वडिलांचा खून करण्यात आला असावा, असा संशय त्यांच्या मुलांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ-३ चे उपायुक्त एम. राजकुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद

निमगडे यांचा पाठलाग करताना आरोपी हा ओरिएंटर हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मर्यादेपासून खूप लांब असल्याने त्याचे चित्र स्पष्ट दिसत नाही. याशिवाय त्याने चेहऱ्याला कापड बांधलेले होते. तरीही पोलीस आरोपीच्या शरीरयष्टीवरून पोलीस अहवालावरील गुंडांची माहिती गोळा करीत आहेत. लवकरच आरोपीचा शोध लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंधरा चमूंकडून वीसपेक्षा अधिक गुन्हेगारांची चौकशी

या प्रकरणाचा छडा लावून मारेकऱ्यास जेरबंद करण्यासाठी नागपूर पोलिसांच्या पंधरा चमू वेगवेगळया दिशेने काम करीत आहेत. यात गुन्हे शाखेच्या दहा आणि परिमंडळ-३ च्या पाच चमू काम करीत आहेत.

अवैध शस्त्रे बाळगणारे पोलीस अहवालावरील वीसवर गुन्हेगारांना पोलिसांनी तपासले असून शहरातील अनेक कुख्यात गुंडांची झाडाझडती सुरू आहे. बातमी लिहीस्तोवर मारेकऱ्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते.