अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यावर सरकारचा निर्णय

नागपूर : सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार असल्याने अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उपराजधातील ४५ हजार ७१६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

राज्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती  दिली. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी याबाबतचा निर्णय सरकार घेत नव्हते. यामुळे सर्व स्तरावरून टीका होत होती. राज्य सरकारने अखेर  निर्णय जाहीर केला आहे.

यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ९ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबरपूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत.

नागपूर महापालिका क्षेत्रातील कला, विज्ञान, वाणिज्य आणि एमसीव्हीसी शाखेच्या ५९ हजार १७० जागांसाठी ४० हजार ९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील पहिल्या फेरीत १८ हजार १३२ जागांवर प्रवेश जाहीर झाले होते. यातील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. मात्र, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने ४५ हजार ७१६ जागांवरील प्रवेश रखडले होते. आता एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातील प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याने शहरातील उर्वरित जागांवर प्रवेश होणार आहेत.

आरटीई प्रवेशासाठी शनिवारपर्यंत मुदतवाढ 

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील ६०९ बालकांच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत होती. या प्रवेश प्रक्रियेला २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई पोर्टलवर प्रवेशाच्या मुदतवाढीबाबत होमपेजला सूचना उपलब्ध आहे. आरटीअंतर्गत शहरातील शाळांमध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत ५ हजार ६४५ बालकांना प्रवेश दिला आहे. नागपूर  जिल्ह्यात ६ हजार ७८४ राखीव जागा असून ३१ हजार ४४ अर्ज प्राप्त झाले होते. प्रतीक्षा यादीतील जागांवर पालकांनी त्वरित प्रवेश घ्यावा,  असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी केले आहे.

ग्रामीणमधील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंद

जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्या तरी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांकडून अपेक्षित संमतीपत्र न मिळाल्याने आता ग्रामीणमधील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना मात्र शाळेत जावे लागणार हे विशेष.

१०६ शिक्षकांना करोना

जिल्हयातील शाळांमध्ये ५ हजार ७७९ शिक्षक असून त्यांची करोना चाचणी केली असता आतापर्यंत १०६ शिक्षकांचा करोना अहवाल सकारात्मक आला. सुरुवातीला ३६ शिक्षकांचा अहवाल सकारात्मक आल्याने शाळा कशा सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, आता करोना झालेल्या शिक्षकांची संख्या १०६ पोहचल्याने तूर्तास शाळा सुरू करणे कठीण असल्याने  १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.

  • एकूण जागा                                     –  ५९,१७०
  • विद्यार्थ्यांची नोंदणी                          – ४०,९९०
  • आतापर्यंत झालेले प्रवेश                 – १३,५४५
  • रिक्त जागा                                   – ४५ हजार ७१६