पहिल्या इयत्तेच्या प्रवेशाचे वय ६ वरून ५ वर्षे करणार नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सरकारची भूमिका मांडली. पहिली काही वर्षे मुले परिवारासोबत राहणे आवश्यक असते. नेमके यांच काळात आपण त्यांना सहा-सहा तास बाहेर का ठेवायचं, असा सवाल त्यांनी विचारला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या १ लाख मुलांसाठी १४ लाख मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचे असे सांगत पहिलीचे वय ६ वर्षे केल्यामुळे स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी फेटाळला.

आमदार दत्तात्रय सावंत यांनी पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे करण्याबाबत प्रश्न विचारला होता. स्पर्धापरीक्षेवेळी मुलांचे नुकसान होत असल्याचे सावंत यांनी म्हटले होते. त्यावर त्यांनी पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच राहील हे स्पष्ट केले. ते म्हणाले, अनेक बालमानसोपचार तज्ज्ञांशी मी याबाबत चर्चा केली आहे. या वयात मुले कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचे असते. पण आपण त्यांना नेमके याचवेळी आपल्यापासून दूर करतो. आपण पहिली प्रवेशाचे वय जर ५ वर्षे केले तर सिनिअर केजी, ज्यूनियर केजीचे वय कमी होईल. पालक वयाच्या दुसऱ्या वर्षीच मुलांना नर्सरीत टाकतील. आपल्याला मुलांचे बालपण हरवण्याची इतकी घाई का झाली आहे, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या १ लाख मुलांसाठी १४ लाख मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचे असे सांगत पहिलीचे वय ६ वर्षे केल्यामुळे स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी फेटाळला. आपल्याकडे पहिली ते १२ वीपर्यंत २ कोटी विद्यार्थी आहेत. पण स्पर्धा परीक्षेसाठी १ कोटी ९० लाख मुलांचे बालपण खुरडण्याचा आपल्याला अधिकार कोण दिला आहे. बाकीच्या राज्यात पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कायदा मोडला म्हणून आपण तो मोडायचे, असे होणार नसल्याचे त्यांनी म्हटले.