News Flash

उपराजधानीत ४० मुलांना पहिल्या लसीची मात्रा

भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित कोव्हॅक्सिन लसींची लहान मुलांवरील चाचणी अखेर नागपूरच्या मेडिट्रिना रुग्णालयातील केंद्रावर रविवारी सुरू झाली.

पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांवर वैद्यकीय चाचणी

नागपूर : भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित कोव्हॅक्सिन लसींची लहान मुलांवरील चाचणी अखेर नागपूरच्या मेडिट्रिना रुग्णालयातील केंद्रावर रविवारी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील ४० मुलांना या लसीची पहिली मात्रा दिली गेली. लस देण्यापूर्वी मुलांच्या काही चाचण्या करण्यात आल्याची माहिती या वैद्यकीय चाचणीचे प्रमुख डॉ. वसंत खळतकर यांनी दिली.

लस देण्यापूर्वी स्वयंसेवक म्हणून पुढे आलेल्या १२ ते १८ वयोगटातील ५१ मुलांची आरटीपीसीआर, अ‍ॅन्टीबॉडी, रक्ताशी संबंधित काही चाचण्यांसह इतरही काही चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ४० मुलांना लस दिली गेली. मुलाला एकही गंभीर आजार नाही, तो सुदृढ असलेल्यांचीच चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात आली. लस देताना पालकांना मुलांबाबत घ्यायच्या काळजीबाबत डॉक्टरांकडून समुपदेशनही केले गेले. लस दिल्यावर येथे काही तास मुलांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले गेले. त्यात एकाही मुलांमध्ये काहीही अनुचित समस्या झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचेही डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले. चार दिवस या मुलांमध्ये काहीही अनुचित न आढळल्यास दुसऱ्या टप्प्यात येथे २ ते ६, ६ ते १२ या वयोगटातील मुलांवरील चाचणीला सुरुवात होणार आहे.

देशात नागपूरसह नोएडा, पटना, हैद्राबाद या चार केंद्रांवर या चाचण्या होणार आहे. सर्व केंद्रांवर २ ते ६, ६ ते १२, १२ ते  १८ या तिन्ही गटातील ५२५ मुलांना लस दिली जाईल. एकूण लसींपैकी नागपूरच्या वाटय़ाला १०० ते १२५ मुलांना लस दिली जाणार असल्याचेही डॉ. खळतकर म्हणाले. मेडिट्रिना रुग्णालयाचे संचालक डॉ. समीर पालथेवार म्हणाले, तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर करोनाचा परिणाम जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपासून मुलांना लसीकरणातूनच वाचवणे शक्य आहे. त्यानुसारच देशात प्रथमच लहान मुलांची करोना प्रतिबंधक लसीची वैद्यकीय चाचणी होत आहे.

पहिली मात्रा ‘०.५ एमएल’

लसीकरणादरम्यान निवड झालेल्या मुलाला पहिली मात्रा ‘०.५ एमएल’ची दिली गेली. त्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी मात्रा दिली जाईल. वयस्क व्यक्तींनाही लसीकरणादरम्यान एवढीच मात्रा दिली जात असल्याचेही डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले.

नकळत करोना होऊन ११ मुले बरीही झाले

लस घेण्याची तयारी दर्शवणाऱ्या सर्व ५१ मुलांची प्रतिपिंड तपासणी (अ‍ॅन्टिबॉडी टेस्ट) करण्यात आली. त्यात ११ मुलांचा अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना नकळत करोना होऊन गेला. ते बरे होऊन त्यांच्यात करोनाविरुद्ध लढण्याचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) तयार झाल्याचेही पुढे आले. त्यामुळे ही अकरा मुले वगळून इतरांचे लसीकरण झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 2:51 am

Web Title: first vaccine given 40 children capital ssh 93
Next Stories
1 जिल्ह्य़ात करोना सकारात्मकतेचा दर दोन टक्क्यांहून खाली!
2 वाघांच्या संचारक्षेत्राचा विस्तार
3 म्युकरमायकोसिसचे ८४ टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील
Just Now!
X