नागपूरच्या बोरगाव चौकातील खून प्रकरणातील पाच आरोपींना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी गोही ऊर्फ गणेश चाचेरकर आणि त्याची काही साथीदार अद्यापही फरार आहेत.

चेतन ऊर्फ बंटी सुरेश वासनिक (१९), अमोल ऊर्फ चिमण्या सुरेश डोंगरे (१९), नीलेश ऊर्फ बिट्टू प्रकाश बेहरिया (२५), सुमित ऊर्फ नत्थ्या नरेश जामगडे (२२), त्रिनेश ऊर्फ सन्नी वसंत पाटील (२२) सर्व राहणार गोरेवाडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सारंग केशव मदने (२४) रा. बोरगाव, पटेल नगर यांची टोळी असून त्यांनी गिट्टीखदानमध्ये वर्चस्व वाढवणे सुरू केले होते. त्याने गोही ऊर्फ गणेश चाचेरकर याला खंडणी म्हणून पैशाची मागणी करत न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. गणेश हा व्याजाने पैसे वाटणाऱ्या काही दुकानदारांची वसुलीची कामे करीत होता. त्याची वसुली लाखोत होती. त्यामुळे सारंग मदनेकडून गणेशकडे पैशाची मागणी करण्यात आली. जीव जाण्याच्या भीतीपोटी सारंगचाच खून करण्याची योजना गणेशने आखली. शनिवारी रात्री साडेदहा वाजता सारंग मदने बोरगाव चौकातील दिनशॉ फॅक्टरी चौकात पानठेल्यावर उभा होता. माहिती मिळताच गणेश चाचेरकर आठ ते दहा साथीदारांसह चौकात पोहचला. त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने सारंगचा खून केला. पाच आरोपींना अटक झाली असली तरी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.