महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : परिवहन खात्याने पाच दिवसांच्या आठवडय़ाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी २०२० पासून सुरू  केल्याने वाहन परवान्यासाठी शनिवारची ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जदारांचे काय असा प्रश्न पडला आहे. जिल्हास्तरावर काही कार्यालयांनी शनिवारी सेवा दिली. परंतु पुढे काय, याचे उत्तर कुणाकडेच नाही.

परिवहन खात्याने वाहन परवान्यासाठी ऑनलाइन अपॉईंटमेंटची पद्धत सुरू केली आहे. संकेतस्थळावर अर्जदारांना सुटीचे दिवस सोडून इतर दिवशी अगाऊ  वेळ  (अपॉईंटमेंट) घेता येते. त्या दिवशी अर्जदाराला आरटीओ कार्यालयात जावे  लागते. सध्या तीन महिन्यांपूर्वीची तारीख व वेळ निश्चित करण्याची सोय आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या पूर्वी अनेकांनी शनिवारची वेळ घेतली. मात्र खात्याने २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू केला. त्यामुळे शनिवार-रविवारी कार्यालय बंद राहिल. परिणामी ज्यांनी शनिवारची वेळ घेतली त्यांचे काय असा प्रश्न पडला आहे.

पाच दिवसाचा आठवडा लागू करताना विविध आरटीओ कार्यालयांत तीन महिन्यांपर्यंत शनिवारच्या नोंदणीचा विचार केला नाही. विशेष म्हणजे झालेल्या बदलाची सूचनाही संबंधितांना दिली नाही. नागपूरच्या शहर, पूर्व नागपूर, ग्रामीण आरटीओ कार्यालयांने मात्र सौजन्याचा परिचय देऊन पहिल्या शनिवारी सुट्टी रद्द करून अर्जदारांची चाचणी घेतली. मात्र पुढच्या आठवडय़ांमध्येही हीच समस्या निर्माण होणार आहे. त्यांचे काय? या प्रश्नावर कुणाही अधिकाऱ्यांना माहिती नाही.

‘ऑनलाइन’ अद्यापही शनिवारचा पर्याय

पाच दिवसांचा आठवडा केल्यावर संकेतस्थळावरून शनिवारीची नोंदणी बंद व्हायला हवी. परंतु अद्याप असे झाले नाही. नागपूरसह काही आरटीओ कार्यालयांनी त्यांच्या अधिकारात शनिवार गोठवला आहे. पण अजूनही काही कार्यालयांत शनिवारीचा पर्याय आहे.

दररोज १० हजार परवाने

राज्यातील १६ प्रादेशिक आणि ३४ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत रोज सुमारे दहा हजार शिकाऊ परवाने दिले जातात. पाच दिवसाच्या आठवडय़ामुळे पुढच्या शनिवारी कार्यालय बंद असल्यास अर्जदारांच्या वाहन परवान्याची मुदत दोन-चार दिवसांत संपत असल्यास त्याला नव्याने शिकाऊ परवाना काढावा लागेल. अनेक जण सुविधा केंद्रात ५० रुपये शुल्क अदा करून ऑनलाईन वेळ घेतात. आता नवी वेळ घेण्यासाठी त्याच्यावर अतिरिक्त भरुदड बसणारआहे.