गडचिरोली जिल्ह््यात पोलिसांनी केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत सोमवारी सकाळी पाच नक्षलवादी ठार झाले. त्यांत दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह््यातील खोब्रामेंढा जंगलात पोलिसांनी ही नक्षलविरोधी कारवाई केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. खोब्रामेंढा जंगलात २५ नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या विशेष नक्षलविरोधी कक्षाच्या सी-६० कमांडोंनी सकाळी ७.३० वाजता धडक कारवाई सुरू केली. नक्षलवाद्यांनी कमांडोंवर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन महिला नक्षलवाद्यांसह पाच नक्षलवादी ठार झाल्याचे गडचिरोलीचे उपपोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

नक्षल आठवड्यानिमित्त नक्षलवादी मोठ्या संख्येने एकत्र जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या विशेष नक्षलविरोधी कक्षाच्या सी-६० कमांडोंनी शनिवारी हेतलकसा जंगलात नक्षलविरोधी कारवाई केली. ६०-७० नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडोंवर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल कमांडोंनी गोळीबार केला. गोळीबाराची धुमश्चक्री तासभर सुरू होती. त्यानंतर नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला.

घटनास्थळावरून पोलिसांनी एक बंदूक आणि तीन प्रेशर कुकर बॉम्ब जप्त केले. पोलिसांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा नक्षलवाद्यांचा कट होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.