नैराश्याने ग्रासलेल्या माथेफिरूचे कृत्य

नागपूर : प्रेयसीने विवाहास नकार दिल्यामुळे संतप्त प्रियकराने रस्त्याने जाणाऱ्या पाच लोकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

ऋतिक ऊर्फ सोमेश विलास पराते (१९) रा. पाचपावली असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर, रमेश श्रावण निखारे, प्रतीश सुरेंद्र खापरे व मोहम्मद शेखावत अन्सारी मोहम्मद खाजम मारहूम अशी हल्ल्यात जखमींची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी  बारावीत असताना त्याचे एका विद्यर्थिनीसोबत प्रेमसंबंध जुळले. बारावीनंतर आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थिनीने शिक्षण सोडून दिले.

दोघेही विभक्त झाल्याने ऋतिक दारूच्या आहारी गेला. परिणामी, तरुणीने त्याला टाळायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी तो तरुणीला भेटला. तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. त्यामुळे संतप्त ऋतिकने तिची छेड काढली होती. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सोमवारी रात्री त्याने पुन्हा  तरुणीलाला गाठले. लग्नाची मागणी घातली.

तरुणीने नकार दिला. प्रेमभंगाच्या नैराश्यातून  त्याने रस्त्यांवरील पादचाऱ्यांवर चाकूने वार करायला सुरुवात केली. एकामागून एक पाच जणांवर चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर ऋतिक याला अटक केली आहे. अवैध शस्त्र बाळगण्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.