नवीन पाच जणांना बाधा; करोनामुक्त रुग्णांची संख्या २८७ वर

नागपूर :  आज बुधवारी गोळीबार चौकातील पाच जणांना विषाणूची बाधा झाल्याचे पुढे आल्याने येथील नागरिकांत चिंता वाढली आहे. उपराजधानीत रोज करोनाबाधित वाढत असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या ९३ अशा दोन आकडी संख्येवर आली आहे.

गोळीबार चौकात पूर्वी करोनाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दोघांच्या संपर्कातील अनेकांना प्रशासनाने  सक्तीने विलगीकरणात घेतले होते. यापैकी प्रत्यक्ष संपर्कातील अनेकांना विषाणूची बाधा नसल्याचे  पुढे आले. परंतु बुधवारी विलगीकरणातील  पाच जणांना  बाधा असल्याचे स्पष्ट झाले. या नवीन रुग्णांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्यांनाही  विलगीकरणात ठेवले जाणार आहे. गड्डीगोदाम येथीलही एकाला विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले. दुसरीकडे आमदार निवासात विलगीकरणात असलेल्या एका नऊ वर्षांच्या मुलीलाही करोना झाला. तिच्या नावाच्या अर्जावर कोंढाळीचा पत्ता नमूद आहे. परंतु तिचे कुटुंब नागपुरात स्थलांतरित झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे. शहरात बुधवारी एकाच दिवशी आणखी सात रुग्ण वाढल्याने आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ३८७ वर पोहचली आहे. यापैकी यशस्वी उपचाराने आजपर्यंत २८७ जण करोनामुक्त तर  त्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील  बाधितांची संख्या केवळ ९३ वर आली आहे. मेडिकलमध्ये ३७ तर मेयोत ५१ बाधितांवर उपचार सुरू आहे.

पोलीस निरीक्षक गृह विलगीकरणात

उपराजधानीत  तीन पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता एका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. करोनाची लागण झालेल्या तहसील पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात दुसऱ्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले होते. त्या पोलीस निरीक्षकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दिवसेंदिवस उपराजधानीतील पोलिसांभोवती करोनाचा विळखा वाढत असून यातून मार्ग काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

निर्देशांचे पालन न केल्यास कारवाई – मुंढे

राज्य शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महापालिकेच्या वतीने केले जात आहे. आतापर्यंत महापालिकेने बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल, संगणक, मोबाईल आणि होम अप्लायंसेस दुरुस्तीची दुकाने अटी व शर्तीवर उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुकानदार, खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.    निदर्शनास आल्यानुसार, जी दुकाने सुरू झालेली आहेत, त्या दुकानांमध्ये  सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्क न वापरणाऱ्यांनाही दुकानात प्रवेश दिला जातो, दुकानातील काही कर्मचारी सुद्धा मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. रात्री ७ वाजतानंतर संचारबंदीचे आदेश असताना बऱ्याच व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. यापुढे यात कसूर होताना आढळल्यास संबंधित दुकानदारांच्या, आस्थापना प्रमुखांच्या तसेच संबंधित बेजबाबदार व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश  मुंढे यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.

चिमुकली बाधित;आई-वडिलांचा अहवाल नकारात्मक

सिंबॉयसिस या विलगीकरण केंद्रातील पाच महिन्यांच्या चिमुकलीलाही विषाणूची बाधा असल्याचे  स्पष्ट जाले. त्यामुळे तिला मेडिकलमध्ये दाखल करत त्यांच्या आई-वडिलांचीही चाचणी करण्यात आली. परंतु त्यांचा अहवाल नकारात्मक आल्याने डॉक्टरांनाही धक्का बसला. त्यामुळे या चिमुकलीला कोणाच्या संपर्कात आल्याने आजार झाला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शबरी माता नगरातील मार्ग बंद

गोरेवाडा परिसरातील शबरी माता नगर येथे करोना  रुग्ण आढळल्यानंतर प्रभाग ११ मधील काही भाग बंद करण्यात आला आहे. या परिसरातील दक्षिण पूर्वस असलेले राजेश चौगले यांचे घर, दक्षिण पश्चिमेस गौतम यांचे घर, उत्तर पश्चिमेस तिवारी चक्की आणि उत्तर पूर्वेस दिलीप राऊत यांचे घर हा परिसर बंद करण्यात आला आहे.

राज्य राखीव पोलीस दलातील पाच जवानांना बाधा

करोना प्रतिबंधित परिसरात कार्यरत राज्य राखीव पोलीस दलातील पाच जवानांना विषाणूची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.  याशिवाय शहरातील इतर भागातील दोघांना करोनाने ग्रासल्याचे नीरीच्या अहवालातून समोर आले आहे.

८५ टक्के रुग्णांत लक्षणे नाहीत

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांत सध्या ९३ बाधित  रुग्णांवर उपचार सुरू आहे. परंतु ८५ टक्क्यांहून अधिक बाधितांत एकही लक्षण नाही. त्यामुळे या रुग्णांना केंद्र सरकारच्या करोनाबाबतच्या नवीन सूचनेनुसार लवकरच  रूग्णालयातून सुट्टी होण्याची शक्यता आहे.