23 September 2020

News Flash

Coronavirus : वृद्ध दाम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू

१४४ नवीन बाधितांची भर; सक्रिय रुग्णसंख्या अकराशे पार

संग्रहित छायाचित्र

१४४ नवीन बाधितांची भर; सक्रिय रुग्णसंख्या अकराशे पार

नागपूर : रेशीमबागच्या पुष्पांजली अपार्टमेंटमधील दाम्पत्यासह मेयो आणि मेडिकलमधील तीन रुग्णांचा आज मंगळवारी मृत्यू झाला. याशिवाय  दिवसभरात १४४ नवीन करोना बाधितांची भर पडली. या नवीन रुग्णांमुळे  प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या अकराशे पार गेली आहे.

मेयो रुग्णालयात मृत्यूची नोंद झालेल्या करोनाबाधित रुग्णांमध्ये कन्हानच्या ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. त्याला दगावलेल्या अवस्थेत नातेवाईकांनी २० जुलैला रुग्णालयात आणले होते. आज मंगळवारी त्याचा अहवाल सकारात्मक आला. तर दुसरा दगावलेला ५१ वर्षीय रुग्ण कामठीतील (वारीसपुरा) रहिवासी आहे. त्याला श्वसनाशी संबंधित आजारासह मधुमेहही होता. सर्दी, खोकला, ताप असल्याने त्याला मेयो रुग्णालयात १७ जुलैला  दाखल केले होते.

चाचणीत त्याला करोना असल्याचे पुढे आले. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मेडिकलमध्येही एका व्यक्तीच्या मृत्यूची सोमवारी नोंद झाली. त्यामुळे शहरातील आजपर्यंत दगावलेल्या एकूण बाधितांची संख्या थेट ६० वर पोहचली आहे. त्यातच शहरात दिवसभरात तब्बल १४४ नवीन बाधितांची भर पडल्याने आजपर्यंतच्या करोनाबाधितांची एकूण संख्या थेट ३,१७१ वर पोहचली आहे.

बरे होऊन घरी परतलेले रुग्ण वगळून शहरात प्रथमच सक्रिय उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १,१३२ वर पोहचली आहे. यापैकी २२९ रुग्ण मेयोत, २४९ रुग्ण मेडिकलमध्ये, ५० रुग्ण एम्समध्ये, २२ रुग्ण कामठीत, २८ रुग्ण खासगी रुग्णालयात, ३२७ रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये, १२४ रुग्ण मध्यवर्ती कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. १०३ रुग्णांवर रात्री उशिरा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दाम्पत्याच्या मृत्यूने रेशीमबागेत दहशत

एका वृद्ध  दाम्पत्याचा करोनाने बळी घेतल्याचे कळताच  रेशीमबाग परिसरात खळबळ उडाली. मृत दाम्पत्याचा मुलगाही बाधित असून सूनेसह नातवंडांना  विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.  पुष्पांजली अपार्टमेंटमध्ये एक जण करोना बाधित आढळला होता. त्याच्या संपर्कात आल्याने  ६२ वर्षीय पुरूष (पती) आणि ६५ वर्षीय महिलेला (पत्नी)  बाधा झाली. वृद्ध पतीचा पहिला अहवाल नकारात्मक आला. त्यानंतर पती-पत्नी दोघेही विलगीकरणातून परत आले. त्यानंतरही वृद्धाला सर्दी, खोकला, तापआल्याने सेव्हन स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पुन्हा  करोना चाचणी केली असता अहवाल सकारात्मक आला.  तिकडे त्यांच्या पत्नीची अचानक प्रकृती खालावून तिचा मृत्यू झाला. तिचे नमुने तपासले असता तिलाही करोना असल्याचे स्पष्ट झाले.

रेल्वे ट्रॅकमन,अग्निशमन कर्मचारीही करोनाग्रस्त

रेल्वे रुळाची देखभाल दुरुस्ती करणारा एक ट्रॅकमन करोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यावर त्याच्या पथकाला विलगीकरणात पाठवण्यात आल्याचे वरिष्ठ विभागीय अभियंता यांनी सांगितले. याशिवाय महापालिकेच्या अग्निशमन विभागात एक कर्मचारी करोना बाधित आढळला.  त्याच्या संपर्कात आलेल्या ३३ जणांची यादी देण्यात आली. मात्र दिवसभर एकाही कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तपासणी न करता घरी कसे परतावे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला होता.

मेडिलच्या कोविड रुग्णालयात चादरीतून संक्रमणाचा धोका!

मेडिकलशी संलग्नित कोविड रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर करोनासह सारीच्या रुग्णांच्या खाटेवरील चादरी वाळवल्या जात असल्याची नातेवाईकांनी तक्रार आहे. या चादरीतून संक्रमण झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहे. ही माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला कळताच  तातडीने चादरी हटवून सुरक्षित ठिकाणी वाळवण्याचे आदेश देण्यात आले.  बाधिताच्या खोकल्यामुळे विषाणूचे संक्रमण झपाटय़ाने होते. असे असतानाही कोविड रुग्णालयाच्या  प्रवेशद्वारावर बाधितांनी वापरलेल्या चादरी वाळू घालण्यात आल्या. हा प्रकार मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या निदर्शनात येताच त्यांनी तातडीने सर्व चादरी काढून सुरक्षित ठिकाणीच वाळू घालण्याचे आदेश दिले. तसेच नकळत हा प्रकार करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासह परिचारिकांची कानउघाडणी केली गेली.

आठ परिसर प्रतिबंधित, सहा मोकळे

करोनाबाधित आढळल्याने मंगळवारी आठ परिसर प्रतिबंधित करत रुग्ण नसल्यामुळे  सहा परिसरातील निर्बंध हटवण्यात आले. मंगळवारी झोनअंतर्गत आदर्श कॉलनी जरीपटका, आशियाना अपार्टमेंट चौबे कटिया भंडारा मार्ग, पोलीस लाईन टाकळी काटोल मार्ग,  हनुमाननगर झोनअंतर्गत जम्बुदीपनगर, प्रभाग क्रमांक ३१ वकीलपेठ, हुडकेश्वर श्यामनगर, मानेवाडा परिसरात वेळेकर लेआऊट परिसरातील वैष्णव आर्केड परिसर प्रतिबंधित केले आहे. तर धंतोली झोनमध्ये यशवंत अपार्टमेंट, नरेंद्रनगर, गुरुदत्त सोसायटी, सतरंजीपुरा झोनमध्ये मेहंदीबाग कॉलनी, लालगंज नाईकवाडी, गांधीबाग झोनमध्ये डोबीनगर व माळीपुरा दसरा रोड महाल परिसरातील निर्बंध हटवून ते मोकळे करण्यात आले.

४२ जण करोनामुक्त

आज दिवसभरात ४२ जण करोनामुक्त झाले. आजपर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १,९८१ वर पोहचली आहे.  करोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे.

मृत्यूदर १.८२ टक्क्यांवर

मेडिकल, मेयो या शासकीय तर वोक्हार्ट या खासगी रुग्णालयामध्ये आजपर्यंत नोंदवलेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे ३० जूनपर्यंत झालेले, तर ३३ मृत्यू १ जुलै ते २१ जुलै दरम्यानचे आहेत. अचानक मृत्यू वाढल्याने प्रथमच शहरातील मृत्यूचे प्रमाण हे थेट १.८२ टक्क्यांवर पोहचले आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी हे प्रमाण ०.९५ टक्के होते, हे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:16 am

Web Title: five people including an elderly couple died due to coronavirus zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 गडकरींच्या ‘कोटय़धीश’ सुरक्षा रक्षकाचे पराक्रम उघड! 
2 ‘सर्वासाठी घर’ योजना तांत्रिक अडचणीत अडकली
3 महापौर-आयुक्तांकडून दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई
Just Now!
X