21 January 2021

News Flash

६१ गावांना पुराचा फटका

जिल्ह्य़ात तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरूच

 

जिल्ह्य़ात तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरूच; एकाचा मृत्यू,२२ हजार हेक्टरवरील पीक हानी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तब्बल ६१ गावांना पुराचा फटका बसला असून तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य सुरू होते. कुही तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. एनडीआरएफची एक, एसडीआरएफच्या तीन, एनएमसीची एक आणि तीन स्थानिक अशा ८ चमूंनी  शेकडो लोकांचे प्राण वाचवले. मौदाा तालुक्यातील १८ गावातील १३,३६८, कामठी तालुक्यातील ९ गावातील ६३८१, पारशिवनीतील १३ गावातील ४९१७ आणि कुही तालुक्यातील १२ गावातील २१२७ अशा एकूण २८१०४ लोकांना तीन दिवसांत  सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पावसामुळे २२ हजार ९९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. कुही तालुक्यातील श्रीक्षेत्र अंभोरा, गोंडपिंपरी या गावात अडकलेल्या नागरिकांची लष्कराच्या जवानांनी बोटीच्या माध्यमातून सुटका केली. जिल्ह्यात पूरपीडितांसाठी ६२ निवारा शिबीर उघडण्यात आले. त्यात ६१३८ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रामटेक तालुक्यातील रामटेकहून भंडाऱ्याकडे जाणारा सालई माहुली पूल पेंच नदीच्या पुरात वाहून गेला. दोन वर्षांपूर्वीच या पुलाचे काम झाले होते.

मौदा परिसरातील तीन गावे अंधारात

नागपूरच्या ग्रामीण भागातील पूरस्थितीमुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धस्तरावर मोहीम राबवण्यात येत आहे. नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सोमवारी कन्हान भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाचा आढावा घेतला. दरम्यान, मौदा उपविभागतील ३६ पैकी ३३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून तीन गावांचा पुरवठा खंडित आहे. येथील ग्रामीण भागात येणाऱ्या खापरखेडा, पारशिवनी, खापा, कुही, उमरेड, मौदा या भागात शनिवारी पुरामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद केला होता. यामुळे जीवितहानी झाली नव्हती. तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुरू केली होती. आज प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडळचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून दुरुस्ती कामाचा आढावा घेतला. नागपूर ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे,नागपूर मंडळचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, मौदा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल वैद्य हेही यावेळी उपस्थित होते. मौदा उपविभागतील पूरग्रस्त ३६ पैकी ३३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून राहिलेल्या तीन गावांचा वीजपुरवठा मंगळवार पर्यंत सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणने कळवले आहे.

पंचनामे तातडीने करून मदत द्या – फडणवीस

विदर्भ विशेषत: पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सोळाशे जनावरांचा मृत्यू, साडेसात हजार घरांची पडझड

पुरामुळे १६०२ जनावरांचा मृत्यू झाला, तर ७७६५ घरे पडली. पुराचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवनी, कुही, सावनेर या तालुक्यांना बसला आहे. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यात झाले. पुराच्या पाण्यात तालुक्यातील १५९१ जनावरे वाहून गेली, तर १४६३ घरे पडली. कामठी तालुक्यातील २ जनावरे वाहून गेली तर १७१५ घरे पडली. काटोल तालुक्यातील १ जनावर वाहून गेले आणि १२१ घरे पडली. सावनेर तालुक्यात ३ जनावरे वाहून गेली तर ३४८ घरे पडली. रामटेक तालुक्यात १ व्यक्तीचा मृत्यू झाला. ३ जनावरांचा मृत्यू झाला आणि २६३ घरे पडली. भिवापूर तालुक्यातील २ जनावरे वाहून गेलीत तर १० घरे पडली. कुही तालुक्यात ९० घरांचे नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यात ३५०० घरांचे नुकसान झाले.

हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई द्या – बावनकुळे

जिल्ह्यात २७ व २८ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी व महापुरामुळे  पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. पिकांचे त्वरित सर्वेक्षण करून या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई व बेघर झालेल्या नागरिकांना खावटीची मदत शासनाने करावी, अशी मागणी जिल्हा भाजपतर्फे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, महिला अध्यक्ष संध्या गोतमारे, किशोर रेवतकर, आ. टेकचंद सावरकर  उपस्थित होते.

लष्करी जवानांचे मदत कार्य

लष्कराच्या जवानांनी नागपूरच्या कुही तालुक्यातील ९० पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर सोमवारी ते तातडीने चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामस्थांच्या मदत कार्यात सहभागी झाले. गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी, इंजिनिअरिंग टास्क फोर्स, पुणे आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथील वैद्यकीय पथक पूरग्रस्तांच्या मदत आणि बचाव कार्यात तिसऱ्या दिवशीही सहभागी झाले. कुही तालुक्यातील धामनी, पवनी, गोंगपिपरी या पूरग्रस्त गावात ८० सैनिक आणि तीन नावा सोमवारी तैनात करण्यात आल्या. या जवानांनी ९० ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढले. या परिसरातील नागरिकांना लष्कराच्या वैद्यकीय पथकाने औषधे दिली. आता लष्कराचे जवान चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी पोहचले. कुही तालुक्यापासून ब्रम्हपुरी तालुक्यात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहचून जवानांनी बचाव मदत कार्य सुरू केले. नागपूर जिल्ह्य़ातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुही तालुक्यातील विविध गावात आणि कामठी परिसरात पूर आला असून येथे सैन्यदलाने बचावकार्य केले. कुही तालुक्यातील पूरग्रस्त भागातील लोकांना मदतीसाठी सैन्यदलाने प्रशासनाला सहकार्य केले. आता ब्रम्हपुरी तालुक्यात मदत व बचावकार्य सुरू आहे, असे संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बी.बी. पांडे म्हणाले. दरम्यान, शनिवारी सैन्यदलाने गोरा बाजार, छोटी अजनी, उंटखाना आणि गोदाम परिसरातील नागरिकांना, अन्न, पिण्याचे पाणी आणि जनित्राद्वारे वीजाुरवठा केला. पुरामुळे या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

*  मृत जनावरे – १६०२

*  घरांची पडझड –       ७७६५

*  गोठे – ५०

*  पीक हानी –  २२९९४ हेक्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:46 am

Web Title: floods hit 61 villages in nagpur district zws 70
Next Stories
1 Coronavirus : बाधितांची संख्या तीस हजारांच्या उंबरठय़ावर
2 करोनाबाधित मृताचे अंत्यदर्शन घेणे शक्य होणार
3 संघाच्या कार्यक्रमातील प्रणवदांची उपस्थिती लक्षवेधी ठरली!
Just Now!
X