स्टेनलेस स्टील, शुद्ध पाण्याने सज्ज हातगाडय़ा मिळणार

महेश बोकडे, नागपूर</strong>

रस्त्यांच्या शेजारील हातगाडय़ांवर सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे म्हणून उपराजधानीत नवीन युक्तीवर काम होणार आहे. त्यानुसार सौरपॅनल, स्टेनलेस स्टीलच्या  हातगाडय़ा फेरीवाल्यांना कमी दरात उपलब्ध केल्या जाईल. त्यात पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सीसीटीव्ही, कचरा साठवण्याच्या व्यवस्थेसह इतरही सुविधा असेल.

मिहान, एमआयडीसी, बुटीबोरीसह उपराजधानीतील विविध भागात नवीन उद्योग, महाविद्यालयसह नव-नवीन खासगी व सरकारी कार्यालयांनी भर पडत आहे. शहरात रोजगाराच्या संधी वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठय़ा संख्येने शहराकडे स्थलांतरित होत आहेत. वाढती लोकसंख्या बघता प्रत्येक चौकात हातगाडीवर विविध खाद्यपदार्थाची विक्री करून दोन पैसे कमावण्याचा प्रयत्न करणारे फेरीवालेही वाढत आहेत. पैकी काही जण अन्न व सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक उपाय करत नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अस्वच्छ वातावरणात हाताळणी झालेले अन्न खाऊन नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्नही उद्भवतो.

अन्न व औषध प्रशासन विभागाने शासनाला दिलेल्या  प्रस्तावानुसार शहरात लवकरच एका नवीन प्रकल्पावर काम सुरू होईल. त्यात फेरीवाल्यांना स्टेनलेस स्टील, शुद्ध पिण्याची (बिसलेरी) मोठी बाटली ठेवण्याची सोय, कचरा साठवण्याची सोय असलेली अद्ययावत  हातगाडी मिळेल. त्याच्या छतावर सौर पॅनल राहणार आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या विजेतूनच गाडीतील दिवे प्रकाशमान होतील. गाडीच्या छतावर एक हात धुण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टाकी, तर खाली घान पाणी साठवण्याची टाकी राहील. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर कचरा होणार नाही. सोबत वाहनात विविध भांडे सुरक्षित ठेवण्याची सोय राहील. सोबत आग विझवण्याचीही यंत्रणा गाडीत राहील.

अन्नाचे प्रशिक्षण

नवीन प्रकल्पानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने फेरीवाल्यांसाठी कमी-अधिक फॅट्च्या कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहे. स्वच्छ व सुरक्षित अन्न तयार करण्याचे तंत्र शिकवण्यासाठी हातात मोजे, डोक्यावर कापडी टोपीसह इतर आवश्यक तंत्र शिकवले जाईल. सोबत अन्न व औषध प्रशासनाबाबतच्या कायद्याची माहिती देण्यासह ही हातगाडी  बँकेतून अल्प दरात कर्जातून उपलब्ध करण्यासाठीही मदत केली जाईल.

शहरात १,२०० फेरीवाले विक्रेते

शहराच्या विविध भागात विविध अन्नपदार्थाची विक्री करणारे १,००० ते १,२०० नोंदणीकृत विक्रेते आहेत. अन्न व औषध  प्रशासन विभागाने गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्ह्य़ातील विविध भागात २३३ नोंदणीकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून विविध कारणांसाठी १० लाख २३ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल केले. २०१७- १८ मध्ये या खात्याने ५०४ विक्रेत्यांची तपासणी करत नियमांना छेद देणाऱ्यांना नोटीस बजावत अनेकांकडून मोठय़ा प्रमाणात दंड वसूल केले.

नवीन पद्धतीच्या काही हातगाडय़ांचा प्रयोग पुणे येथे यशस्वी झाला आहे. त्यामुळे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही उपराजधानीत हा प्रकल्प राबवण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. या गाडय़ा घेण्यासाठी शासनाकडून संबंधितांना अल्प दरात कर्ज देण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे.

– शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (अन्न), नागपूर.