गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत असलेल्या गांधीसागराच्या चौपाटीवरील खाऊ गल्लीचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात खाऊ गल्ली खवय्यासाठी सुरू करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या गल्लीचे उद्घाटन होणार आहे.

शहरात खाऊ गल्लीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वीच आला, परंतु प्रशासनाकडून त्यावर अंमलबजावणी केली जात नव्हती. जागेचा शोध घेण्यासाठी जवळपास दोन वषार्ंचा कार्यकाळ गेल्यानंतर गांधीसागराच्या ठिकाणी खाऊ गल्ली सुरू करण्याचा प्रस्ताव आला आणि त्याला मंजुरी मिळाली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. सहा महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत यांनी या खाऊ गल्लीबाबत नियोजन करून १५ ऑगस्टला ती सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याचे नियोजन चुकल्यामुळे खाऊ गल्लीचा शुभारंभ टळला होता. आता मात्र काम पूर्णत्वास आले असून त्या ठिकाणी राजस्थानवरून आणलेल्या फाऊंटेनसह इतरही व्यवस्था करण्यात आली आहे.  राऊत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी खाऊ गल्ली संदर्भात मोठय़ा घोषणा केल्या. मात्र, नियोजनाअभावी काम लांबले होते. या कामाचा वारंवार आढावा घेण्यात आला होता. गांधीसागराशिवाय अन्य ठिकाणी खाऊ गल्ली सुरू करण्याचे प्रयोजन होते. गांधीसागराजवळील काम आता ते पूर्णत्वास आले असून शहरात सुरूहोणारी पहिलीच खाऊ गल्ली राहणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्यपदाथार्ंचे स्टॉल्स असतील. वातावरण सकारात्मक करण्यासाठी नित्यनेमाने संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शहरातील बँड पथकांना आपले कलागुण दाखविण्यासाठी संधी दिली जाणार आहे. या खाऊ गल्लीला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केले जाणार असून ऑरेंज सिटी ही नागपूरची ओळख प्रतिबिंबीत होण्यासाठी भिंतीना नारंगी रंग देण्यात येत आहे.

आम आदमी पक्षाचा आरोप

दरम्यान, खाऊ गल्लीत करण्यात आलेली कामे ही नियमाच्या बाहेर जाऊन करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. खाऊ गल्लीबाबत विविध आक्षेप घेण्यात आले आहेत. या ठिकाणी खाऊ गल्ली निर्माण केली आहे तथे वाहनतळाची सुविधा नाही. अन्न व औषधी विभागाची परवानगी घेतली आहे का, जे स्टॉलधारक खाण्याचे पदार्थ तयार

करतील त्यांची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे, खाऊ गल्लीबाबत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले आहे का, नगररचना विभागाची परवानगी घेतली आहे का, तलावात कचरा टाकला जाणार नाही याची कुठलीही व्यवस्था करण्यात आली आहे का असे विविध प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केले आहे.

खाऊ गल्लीबाबत आम आदमी पक्षाने विविध विभागाच्या मंजुरीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर यापूर्वीच विचार करण्यात आला असून सर्व विभागांची मंजुरी घेण्यात आली आहे. वाहनतळाची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे आता कुठलाही अडथळा येणार नसून लवकरच ही ‘खाऊ गल्ली’ सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी दुकाने लावण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार स्टॉलधारकांना या भागात स्टॉल दिले जातील आणि पारदर्शकता राहणार आहे.

सुधीर राऊत सभापती, स्थायी समिती