महेश बोकडे

सहा वर्षांत डॉक्टर खेळाडूंची संख्या दुप्पट

वाढता ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, कमी झोप आणि इतर कारणांमुळे वरिष्ठ डॉक्टरांमध्येही आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी या डॉक्टर मंडळींनी क्रिकेटचा आधार घेतला आहे.

‘अ‍ॅकेडमी ऑफ मेडिकल सायंसेस’ने डॉक्टरांना व्यायामाकडे वळवण्यासाठी २०१३ ला डॉक्टरांच्या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याची सुरुवात केली. ही कल्पना यशस्वी ठरली असून पूर्वीच्या तुलनेत आता खेळणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

उपराजधानीत मेडिकल, मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), एक शासकीय दंत महाविद्यालय, एक शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांसह इतरही काही खासगी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये आहेत. मोठय़ा संख्येने रुग्ण येत असल्याने  व्यावसायिक रुग्णालयांसह अनेक लहान-मोठे शासकीय व खासगी रुग्णालये येथे आहेत. शहराचा वैद्यकीय हब म्हणून होणारा विकास बघता येथे सुमारे तीन हजार विविध विषयांचे पदव्युत्तर (एमडी, एमएस) डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत.

डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. या व्यस्ततेमुळे ते व्यायाम तर सोडा पुरेशी झोपही घेऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनाही अनेक आजारांना समोर जावे लागत आहे.   व्यायामाकडे वळवण्याकरिता २०१२ मध्ये डॉ. प्रकाश खेतान यांनी डॉक्टरांच्या क्रिकेट सामन्यांचा विचार पुढे आणला.

३० ते ५५ वयोगटातील खेळाडू

डॉक्टरांच्या सहा संघामध्ये ३० ते ५५ वयोगटातील खेळाडू खेळत आहेत. सर्वाधिक वयाच्या खेळाडूत ५५ वर्षीय डॉ. विनोद खंडाईत, ५३ वर्षीय डॉ. गिरीष देशमुख यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षीपासूनच्या सामन्यात खेळणाऱ्यांमध्ये डॉ. अजय देशपांडे, डॉ. संजय देवतळे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. नीलय निंबाळकर, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. सत्यजीत जगताप, डॉ. शैलेश खेळकर यांचा समावेश आहे. प्रत्येक चमूला आयोजकांकडून एक मानसोपचार तज्ज्ञ, एक कोच उपलब्ध केला जातो.

१७ डॉक्टर सहा वेगवेगळ्या संघाचे मालक

डॉक्टरांच्या गॅस्ट्रो कार्डियाक्ट संघात (डॉ. श्रीकांत मुक्कावार, डॉ. जसपाल अर्नेजा, डॉ. श्रेयश मागीया), ब्रेन स्टॉरमर (डॉ. आलोक उमरे, डॉ. आशीष पोंगळे, डॉ. काझमी), नेफ्रो पावर्स (डॉ. समीर चौबे, डॉ. संजय कोलते), पल्मो पावर्स (डॉ. अशोक अरबट, डॉ. आकाश बल्की, डॉ. राजेश सुवर्णकार), नोबल रेस्कूवर (डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. राजन बारोकर), रेडिओ रॉयल्सचे डॉ. दीपक सायंकार, डॉ. अमोल देशमुख, डॉ. सुशील पांडे) असे एकूण १७ वरिष्ठ डॉक्टर मालक आहेत. ते सामन्यापूर्वी आयपीएलच्या धर्तीवर बोली लावून डॉक्टर खेळाडू मिळवतात. जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या सामन्याचे समन्वयक डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. राजेश बल्लाळ आहेत. या सामन्यात कॉमेन्ट्री डॉ. बी. के. शर्मा, डॉ. विजय उपाध्याय यांनी केली. एक महिना चाललेल्या सामन्यांचे छायाचित्रण डॉ. राजीव रॉय, डॉ. दिनेश सिंग यांनी केले.

‘‘क्रिकेटमुळे शहरातील वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांसोबत मित्रता वाढली आहे. सोबतच सर्वामध्ये व्यायाम करण्याची रूची वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत जास्त फिट असल्याचा सर्वाचा अनुभव आहे.’’

– डॉ. संजय देवतळे

‘‘प्रत्येक डॉक्टर २४ तास सेवेत असतो. रुग्णाची प्रकृती खालवल्यास त्याला सर्व काम सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचावे लागते. या व्यस्ततेमुळे त्याला मानसिक आणि शारीरिक आजारही ग्रासतात. या उपक्रमामुळे रात्री उशिरा शस्त्रक्रिया केल्यावरही डॉक्टर पहाटे मैदानात दिसतो. क्रिकेटमुळे तणाव कमी होतो.’’

– डॉ. हरीश वरभे