20 November 2019

News Flash

विदर्भाच्या वाटय़ाला प्रथमच मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद

विदर्भातील प्रभा राव आणि प्रतिभा पाटील यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले होते.

राज्य स्थापनेनंतर दुर्मिळ योग जुळून आला

राजेश्वर ठाकरे, नागपूर

विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यानंतर प्रथमच एकाचवेळी मुख्यमंत्रीपद आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद विदर्भाकडे आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नागपूरचे देवेंद्र फडणवीस आहेत. आता विरोधी पक्षनेतेपदी ब्रम्हपुरीचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची सोमवारी निवड  झाली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद ही दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाला मिळाल्याने या भागातील राजकीय अनुशेष दूर झाल्याची भावना राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसने यापूर्वी विदर्भातील प्रभा राव आणि प्रतिभा पाटील यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दिले होते. परंतु या दोन्ही नेत्यांचा कार्यकाळ अल्प होता. प्रभा राव  यांच्याकडे  फेब्रुवारी १९७९ ते जुलै १९७९ या दरम्यान आणि प्रतिभा पाटील यांच्याकडे जुलै १९७९ ते फेब्रुवारी १९८० या काळात विरोधी पक्षनेतेपद होते. मात्र, या काळात विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले नव्हते. शरद पवार मुख्यमंत्रीपदी असताना प्रभा राव आणि प्रतिभा पाटील विरोधी पक्षनेतेपदी होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी विदर्भातील मारोतराव कन्नमवार, वंसतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या काळात विरोधी पक्षनेतेपद विदर्भाकडे नव्हते. तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले. त्या जागेवर वैदर्भीय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी काँग्रेसने दिली. ते चार वर्षे सभागृहाचे उपनेते होते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला  केवळ एक जागा (चंद्रपूर) मिळाली. तेथे  बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून वडेट्टीवार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. या पाश्र्वभूमीवर वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच विदर्भाला एकाच वेळी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे.  विदर्भाला विधान परिषदेत अनेकदा नेतपद मिळाले आहे. राम मेघे हे जुलै १९७८ ते जुलै १९८० या काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर दत्ता मेघे सप्टेंबर १९८२ ते नोव्हेंबर १९८४ पर्यंत, रा.सू. गवई डिसेंबर १९८८ ते १९९० तसेच डिसेंबर १९९० ते जुलै १९९१ या कालावधीत, नितीन गडकरी ऑक्टोबर १९९९ ते एप्रिल २००५ आणि पांडुरंग फुंडकर एप्रिल २००५ ते डिसेंबर २०११ या कालावधीत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते.

विदर्भातील विरोधी पक्षनेते (विधानसभा)  क्र.   नेते कार्यकाळ

१)     प्रभा राव (काँग्रेस)          फेब्रुवारी १९७९ ते जुलै १९७९

२)     प्रतिभा पाटील (काँग्रेस)    जुलै १९७९ ते फेब्रुवारी १९८०

३)     विजय वडेट्टीवार(काँग्रेस)   २४ जून २०१९ पासून

विदर्भातील मुख्यमंत्री

१) मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर १९६२ ते नोव्हेंबर १९६३)

२) वसंतराव नाईक (डिसेंबर १९६३ ते फेब्रुवारी १९७५)

३) सुधाकरराव नाईक (जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३)

४) देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर २०१४ पासून)

First Published on June 25, 2019 3:30 am

Web Title: for the first time chief minister and leader of opposition from vidarbha zws 70
Just Now!
X