ऐतिहासिक परंपरेला करोनाचा फटका

नागपूर : विदर्भाची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा असलेली काळ्या व पिवळ्या मारबतीसह विविध राजकीय व सामाजिक विषयावर टीका करणाऱ्या बडग्याची मिरवणूक दरवर्षी उत्साहाच्या वातावरणात निघायची. परंतु यावेळी करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मिरवणूक काढण्यात आली नाही.

शेकडो वर्षांच्या इतिहासात परंपरेबरोबर सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणारा मारबत-बडग्या उत्सव यंदा मिरवणुकीशिवाय नागपूरकरांना अनुभवावा लागला. परंपरा खंडित होऊ नये म्हणून जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजाच्यावतीने बुधवारी सकाळी निवडक लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने मारबतीचे पूजन करण्यात आले

आणि त्यानंतर परिसरात फेरफटका मारत तेथील मोकळ्या मैदानात मारबतीचे दहन करण्यात आले. ‘घेऊन जा गे मारबत’च्या

आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडवणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मात्र

करोनामुळे यावेळी मुकले. त्यामुळे जागनाथ बुधवारी व मस्कासाथ परिसरासह बडग्याची मिरवणूक काढणाऱ्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने  नाकर्त्यां राज्य सरकारचा निषेध म्हणून बडग्या तयार करण्यात आला होता. शिडीवर झोपलेल्या या बडग्याचे दहन करण्यात आले.

बालगोपालांचा आवडता असलेला तान्हा पोळा एरवी मिरवणुका काढून विविध भागात साजरा केला जायचा. परंतु यंदा करोनामुळे घरोघरी लाकडी बैलाची पूजा करुन तान्हा पोळा साजरा करण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव बघता  बालगोपालांना कुठेच फिरता येत नसल्यामुळे  त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. अनेकांनी घरोघरी आंब्याचे तोरण लावत तान्हा पोळा साजरा केला.