गेल्या आठवडय़ात विदर्भ आणि मराठवाडय़ासह राज्यातील इतर भागांत झालेल्या वादळी पावसानंतर राज्यातील हवामान सध्या स्थिरावले आहे. मात्र, २४ मार्चपासून राज्यावर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे, काही प्रमाणात गारपिटीचे सावट पुन्हा निर्माण होणार आहे, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अभ्यासक अक्षय देवरस यांनी व्यक्त केला आहे.

२४ मार्चला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नंदूरबार जिल्ह्य़ांसह पुणे विभागातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २५ मार्चला जळगाव, नंदूरबार, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्य़ांतील काही भागात तर नगर, बीड, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.

याचबरोबर २६ मार्चला प्रामुख्याने पश्चिम विदर्भासह नाशिक जिल्हा, खानदेश आणि मराठवाडय़ातील उत्तरेकडे असलेल्या जिह्य़ांत वादळी पावसाचा अंदाज आहे. २७ मार्चला पावसाचे क्षेत्र कमी होईल, पण २८ आणि २९ मार्चला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उल्लेख केलेल्या भागांमध्ये २५ ते २९ मार्च दरम्यान काही प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज आहे आणि आभाळी हवामानामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.

शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. तसेच वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ  नये, असे आवाहन इंग्लंडमधील रेडिंग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी केले आहे.