काळविटांची संख्या एकीकडे देशभरातून कमी होत असताना, शहराच्या परिसरात आढळणाऱ्या काळविटांच्या संरक्षणाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या झुडपी जंगलात वावर असणारे हे काळवीट कधी रस्ते अपघातात तर कधी शिकारीला बळी पडत आहेत. काळविटांची या परिसरातील संख्या पाहता वनखात्याने त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी उचलावी म्हणून सातत्याने दोन वषार्ंपासून ‘हेल्प फॉर अ‍ॅनिमल’ ची चमू वनखात्याकडे निवेदने देत आहेत. मात्र, वनखात्याच्या अखत्यारीत हा परिसर येत नसल्याने तर वनखात्याने दुर्लक्षित भूमिका घेतली नाही ना, अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे.

बुटीबोरी, हिंगणा, बेसा या शहरालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. वन्यजीवप्रेमी त्यांच्या संवर्धनासाठी झटत असले तरीही वनखात्यानेही कुठेतरी याकडे लक्ष देण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे. शहरातील बेसा या परिसराजवळ गेल्या काही वर्षांंपासून मोठय़ा संख्येने काळवीट आहेत. त्याचबरोबर हरीण, ससे, रानमांजर हे वन्यप्राणीही आहेत. बेसापासून दोन किलोमीटर अंतरावरच्या या परिसरात झुडपी जंगलाचे जाळे विस्तारले आहे. तीन वेगवेगळया पट्टय़ात येथे हे वन्यप्राणी आढळतात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातला लागून हे क्षेत्र असल्याने येथून वाहने मोठय़ा संख्येने व वेगात जातात आणि झुडपी जंगल असल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही.

परिणामी उन्हाळयात हे वन्यप्राणी पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडतात. २०१६ हे वर्ष वगळता उन्हाळयात सातत्त्याने या ठिकाणी काळवीट वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडल्याच्या कित्येक घटना घडल्या. त्यावेळी ‘हेल्प फॉर अ‍ॅनिमल’च्या चमूने नागपूर प्रादेशिक वन विभागाला एक निवेदन दिले.

सेमिनरी हिल्सचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी कोलनकर यांना त्यांनी या संपूर्ण परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांचा आणि एकूण अहवाल सादर केला. मात्र, वनखात्याच्या अखत्यारित हे क्षेत्र येत नसल्याने या अहवालाची दखल घेतली गेली नाही. याच परिसरात काठियावाडय़ांनीही ठाण मांडले असून शिकारीच्या घटनाही घडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे झुडपी जंगल तोडून त्या ठिकाणी ले-आऊट टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या वन्यप्राण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

बुटीबोरी, हिंगणा, बेसा परिसरात ३०-३५ हरीण, १०-१५ नीलगाय, ३५-४० रानडुक्कर, २५-३० मोर व लांडोर, १०-१५ पाम सिवेट कॅट, ३०-३५ ससे तसेच काळवीट मोठय़ा संख्येत आहेत. पाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जाताना कित्येकदा ते मृत्युमुखी पडले आहेत. पाण्याची तात्पुरती सोय आम्ही केली असली तरीही या प्राण्यांची संख्या मोठी असल्याने ती अपुरी आहे. ले-आऊटमुळे पुन्हा एकदा हे वन्यप्राणी राष्ट्रीय महामार्गावर आणि वाट मिळेल तिकडे जात आहेत. अशा स्थितीत वाहनाखाली येऊन मृत्युमुखी पडण्याची दाट शक्यता आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर वनखात्याच्या अखत्यारितील झरीचे जंगल आहे. त्या ठिकाणी या वन्यप्राण्यांना नेऊन सोडले तरीही त्यांचा जीव वाचू शकेल. त्यासंबंधी पुन्हा एकदा वनखात्याला निवेदन देणार असल्याची माहिती ‘हेल्प फॉर अ‍ॅनिमल ग्रुप’चे आशिष खाडे, अमित वाहाळे, श्रीकांत अंबर्ते, सचिन काकडे, सचिन झोडे, स्वप्नील बोधाने, विश्वजित उके यांनी दिली.