अद्ययावत आधार कार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्रा’ धरता येणार नाही, असे कारण देत गेल्या दोन दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांना वनरक्षक पदाच्या परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उपराजधानीत उघडकीस आला आहे. विदर्भातल्या विविध शहरातून आलेल्या या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर हाकलल्याने हे विद्यार्थी अक्षरश: रडकुंडीला आले होते.

वनविभाग महापोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणावर वनरक्षक पदासाठी भरतीप्रक्रिया राबवत आहे. ९००च्या जवळपास पदांसाठी राबवण्यात येणाऱ्या या प्रक्रियेचे नियोजन मात्र वनखात्याला करता आले नाही. सुरुवातीपासूनच ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली. मागील आठवडय़ात नऊ जूनला तांत्रिक अडचणीमुळे वनरक्षक पदाचा पेपर अध्र्यावर रद्द करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दहा जूनला हीच अडचण निर्माण झाली. नाशिक, यवतमाळ येथे मोठय़ा प्रमाणात हा गोंधळ झाला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली. पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे त्याठिकाणी ही परीक्षाच रद्द करण्यात आली. त्यानंतर नागपूर येथे सहा-सात केंद्रांवर वनरक्षक पदासाठी पेपर घेण्यात आला. मात्र, हिंगणा परिसरातील जी.एच. रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयातील केंद्रावर अद्ययावत आधार कार्ड चालणार नाही, म्हणून शेकडो विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आले. या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण देत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काढण्यात आले. विद्यार्थी आत येऊ नये म्हणून प्रवेशद्वाराबाहेर सुरक्षारक्षकांची फौज उभी करण्यात आली होती. यवतमाळ, अमरावती आदी शहरातून सकाळपासून हे विद्यार्थी मोठय़ा अपेक्षेने आले होते. केंद्रावरील व्यवस्थापनाकडूनही विद्यार्थ्यांना कोणतेच सहकार्य मिळाले नाही. गुरुवारी पहिल्या दिवशी सुमारे २०० विद्यार्थी याच कारणास्तव परत गेली. शुक्रवारी देखील १००-१५० विद्यार्थी याच कारणास्तव परत गेले. या विद्यार्थ्यांनी बराच वेळ केंद्र परिसरात ठाण मांडले होते. अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी देखील रडले. आम्ही गुन्हेगार नाहीत, आमच्या अद्ययावत आधार कार्डावर संपूर्ण माहिती आहे. आम्हाला परीक्षा देऊ द्या, अशी गयावया ते करत होते. यासंदर्भात या संपूर्ण परीक्षेचे नियोजन करणारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.आर. मंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला तर ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

मी यवतमाळवरून आली आहे. इतर सरकारी पदांसाठी अर्ज देण्यासाठी गेले तर अद्ययावत आधार कार्ड मागतात. अद्ययावत आधार कार्डावर तुम्ही परीक्षा नाही देऊ शकत, दुसरे ओळखपत्र घेऊन या असे सांगत आहेत. जर तेही करता येणार नसेल तर एफआयआर आणायला सांगतात. शहरापासून हे केंद्र १६ किलोमीटर आहे. येथून परत जायचे म्हटले तर वेळ निघून जाईल.

– प्रियंका शेंडे, परीक्षार्थी

अद्ययावत आधार कार्ड असतानाही आम्हाला परीक्षेला बसू दिले नाही. आम्ही इतक्या दुरून आलो. अद्ययावत आधार कार्ड जर ग्रा’ धरत नसतील तर आम्ही परीक्षेपासून वंचित राहायचे का? मागील वर्षीही आम्ही परीक्षा दिली. केवळ दोन-चार अंकांनी आम्ही पात्र ठरू शकलो नाही. त्यामुळे यावेळी पूर्ण तयारीनिशी परीक्षा देण्यासाठी आलो तर हा प्रकार घडला. वय निघून गेल्यानंतर काय करणार?

– गोपाळ राठोड, परीक्षार्थी