प्रसिद्धी व माहिती अधिकाऱ्याविना सुरू असलेला वनखात्यातील या विभागाचा कार्यभार नियमित अधिकारी मिळाल्यानंतर स्थिर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तब्बल एक-दीड वर्षांनंतर या विभागाला नियमित अधिकारी मिळाला. मात्र, हा अधिकारीसुद्धा चार महिन्यानंतर सेवानिवृत्त होत असल्याने पुन्हा एकदा हा विभाग अधिकाऱ्याविना पोरका होणार आहे. विशेष म्हणजे अधिकारी असताना या विभागाचा कारभार जेवढा नियमित नव्हता, त्याहून नियमित कारभार कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सुरू होता. वनखात्याला प्रसिद्धी व माहिती अधिकाऱ्याचे पद लाभदायक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राज्याच्या वनखात्याचे मुख्यालय नागपुरात आहे आणि या मुख्यालयात एक प्रसिद्धी व माहिती कक्षसुद्धा आहे. या कक्षाची धुरा एक-दीड वर्षांपूर्वीपर्यंत कमलाकर धामगे यांच्या हातात होती. त्यांच्या बदलीने हे पद रिक्त झाल्यानंतर या विभागाची तात्पुरती धुरा मुख्यालयातील संरक्षण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली. धामगे यांच्या कार्यकाळात प्रसारमाध्यमांमध्ये या विभागाबद्दल प्रचंड ओरड होती. वनखात्याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करीत असताना झालेल्या निर्णयांची, कार्यक्रमांची माहिती कालावधी उलटून गेल्यानंतर हाती लागत होती. त्यांच्या बदलीनंतर नाईक यांनी या विभागाचा प्रभारी कार्यभार स्वीकारला. मात्र, त्यांच्या संरक्षण विभागातच कामे अधिक असल्याने पुरेसे लक्ष त्यांना या विभागाकडे पुरवता आले नाही. संरक्षण कक्षात बसूनच त्यांनी प्रसिद्धी व माहिती विभागाची सूत्रे हाताळण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील इतर शिलेदारांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. धामगे यांच्या कार्यकाळात हा विभाग जेवढा सुस्त होता, किंबहूना त्याहून अधिक वेगाने या विभागाची घोडदौड सुरू झाली. प्रसारमाध्यमांशी संपर्क ठेवण्यापासून तर त्यांना माहिती पोहोचवण्यापर्यंतची सगळी कार्ये जेव्हाच्या तेव्हा पार पडत गेली. त्यामुळे या खात्याशी दुरावलेले प्रसारमाध्यमांचे संबंध पुन्हा एकदा जुळले. एखाद्या विभागाला अधिकारी मिळाला नाही की त्या खात्याचा कारभार गडगडतो, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, हा समज राज्याच्या वनखात्याने खोटा ठरवला आहे.

पुन्हा चार महिन्यानंतर काय?
जुलै २०१५ मध्ये राज्याच्या वनखात्यातील प्रसिद्धी व माहिती विभाग सामाजिक वनीकरण विभागाकडे वळता करण्यात आला. संकेतस्थळ अद्ययावत करण्याची, विभागाशी संबंधित बातम्यांची कात्रणे जमा करण्याची जबाबदारी श्रीकांत नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली. तर वनखात्याच्या प्रसिद्धीसंदर्भातील माहितीचे फलक, कापडी फलक आदींची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाच्या उपमहासंचालकांकडे सोपवण्यात आली. आता या विभागाला गोंदिया येथे सामाजिक वनीकरण विभागात उपसंचालक असलेले देशमुख यांच्या रूपाने कायमस्वरुपी अधिकारी मिळाला, पण अवघ्या चार महिन्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती असल्याने नंतर काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.