वनकर्मचाऱ्यांकडे नित्याच्या कामासह नवी जबाबदारी

नागपूर : जंगल आणि वन्यजीवांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असताना मार्चच्या मध्यान्हात  टाळेबंदी लागली. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या वनरक्षकांना मात्र त्यांच्या कामकाजातून मुभा नव्हती. स्वत:ची काळजी घेत ही जबाबदारी पार पाडावी लागणार होती, पण संरक्षणासोबतच जागरूकता ही  अतिरिक्त जबाबदारी करोनाने सोपवली. स्वत:ची काळजी घेत पार पाडल्या जाणारी ही नवीन जबाबदारी बरेच काही शिकवत असल्याची प्रतिक्रि या  वनकर्मचारी आता व्यक्त करीत आहेत.

जंगलातील पायपीट वनखात्याच्या या कर्मचाऱ्यांसाठी नित्यनेमाचीच. त्यात एक दिवसही खंड नसतो. करोनाने डोके  वर काढल्यानंतरही गस्तीच्या ‘पॅटर्न’मध्ये काही बदल झाला नाही. दरम्यान, पर्यटनाला ‘ब्रेक’ दिल्याने जंगलातले वातावरण सुन्न झाले होते. साधे झाडावरून पान पडले तरी आवाज येईल, अशी स्थिती असताना वन्यजीव गावांकडे वळण्याचे प्रमाण वाढले. उमरेडसारख्या परिसरात घडलेल्या एक-दोन घटनानंतर गावकऱ्यांमध्ये जनजागृतीची अतिरिक्त जबाबदारी वनरक्षकांच्या खांद्यावर आली.

त्या आधारावर एकीकडे जंगलातील गस्त आणि दुसरीकडे गावागावात जाऊन जनजागृती अशा दोन्ही पातळीवर या वनरक्षकांना लढा द्यावा लागत आहे.

नागपूरच्या प्रादेशिक वनखात्याने जनजागृतीसाठी उद्घोषणा तयार के ली. ही तयार उद्घोषणा प्रत्येक वनक्षेत्राला देण्यात आली. सकाळ आणि सायंकाळच्या जंगलातील गस्तीनंतर वनखात्याचे कर्मचारी या तयार उद्घोषणेसह गावात जनजागृती करतात. जंगलातून बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षणासोबतच करोनाकाळात कशी काळजी घ्यायची, हे गावकऱ्यांना सांगत ही दुहेरी जबाबदारी हे वनरक्षक पार पाडत आहेत.

अर्थातच जंगलात आणि गावात फिरताना हा जंगलाचा रक्षणकर्ता सॅनिटायझर, मास्क, हातमोजे अशा सुरक्षेच्या साधनासह  फिरत आहे.

करोनाकाळात सामूहिक गस्तीच्या पद्धतीत बदल

जंगलात गस्त करताना एका समूहात तीन किं वा जास्तीत जास्त चार लोक असतात. सामूहिक गस्तीच्या पद्धतीत करोनाकाळात बदल करावा लागला. पाचपेक्षा अधिक लोक समूहात असतच नाहीत. एखादा वनरक्षक किं वा त्याहीपेक्षा वरिष्ठ व्यक्तीचा निवास परिसर करोनामुळे बंद करण्यात आला. याठिकाणच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात येण्यापासून मज्जाव के ला जातो. गस्तीसह जबाबदारीत वाढ झाल्याने थोडय़ाफार अडचणी येत असल्या तरीही मानव-वन्यजीव संघर्षांची घटना मात्र नाही.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात  तेंदू हंगाम सुरू झाला होता. त्यामुळे तेंदू गोळा करण्यासाठी जंगलात जाणाऱ्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांचा हल्ला होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील समजावून सांगावे लागत होते. आमची जी ठरलेली कार्यशैली होती, त्यात काळजी हा नवा विषय समाविष्ट झाला. ही काळजी पूर्णपणे घेण्यात आली. म्हणूनच नागपूर प्रादेशिक वनखात्यात मानव-वन्यजीव संघर्षांची एकही घटना घडली नाही.

– आशीष निनावे, वनपरिक्षेत्र अधिकारी.