वनखात्यातील महत्त्वाची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असताना, दुसरीकडे मात्र या पदासाठी पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून घरी बसवून ठेवण्याचा प्रकार वनखात्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
दीड दशकांपूर्वी असाच प्रकार वनखात्यात एका अधिकाऱ्याबाबत घडला होता. त्यावेळी वनखात्याच्या या कारभाराला कंटाळून त्या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीची वाट पत्करली. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडण्याची प्रतीक्षा वनखात्याला आहे काय, अशी चर्चा आता वनाधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे.
वनखात्यात सध्या अननुभवी वनाधिकाऱ्यांचा भरणा अधिक आणि अनुभवी अधिकाऱ्यांची वानवा, असे चित्र आहे. असे असताना मोजक्याच असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा मात्र वनखात्याला घेता येत नाही. वनखात्यातील पदभरतीवरून आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना या प्रकाराने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वन्यजीव खात्यातील महत्त्वाची कामगिरी आणि अनुभवाच्या बळावर रवीकिरण गोवेकर यांची गडचिरोलीवरून थेट राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
सुमारे चार ते पाच वष्रे त्यांनी या पदावर असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जंगल आणि वन्यजीवांच्या संवर्धनाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला थेट नाही म्हणण्याची ताकद याच अधिकाऱ्यात होती.
मात्र, त्यांचा हाच थेट भूमिका घेण्याचा स्वभाव त्यांना नडला. पर्यावरण नंतर आणि विकास आधी, अशी भूमिका घेत विकास प्रकल्पांना प्राधान्य देणाऱ्या सरकारला कदाचित या अधिकाऱ्याची अडचण निर्माण झाली आणि त्यांना या पदावरून दूर सारण्यात आले.
यानंतर इतर विभागात त्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा असतानाच एक-दोन नव्हे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून या अनुभवी अधिकाऱ्याला विनावेतन घरी बसवून ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात वनसंरक्षक दर्जाचे महत्त्वाचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे, पण ती जागा घेणारी गोवेकरांसारखी व्यक्ती असतानासुद्धा वनखाते डोळे मिटून पडले आहे. त्यामुळे सुनील बानुबाकोडे यांच्यासारखाच गोवेकरांचाही बळी तर जाणार नाही ना, अशी चर्चा आता वनखात्यातच रंगू लागली आहे.
गेल्या २००१ मध्ये असाच प्रकार सुनील बानुबाकोडे या वनाधिकाऱ्याबाबत घडला होता. देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानमध्ये तब्बल पाच वष्रे काम केल्यानंतर या अधिकाऱ्यालासुद्धा सामाजिक वनीकरण विभागात सडवण्यात आले. तेथून वनखात्याच्या माहिती विभागात त्यांची रवानगी करण्यात आली.
अनुभवाचा उपयोग होत नसल्याचे बघून ते पाच वर्षांच्या अभ्यास रजेवर गेले. त्यानंतर ते परतले तेव्हा त्यांनाही घरीच बसवून ठेवण्यात आले. वनखात्याच्या या अजब कारभारला कंटाळून अखेर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती.