माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं म्हटलंय. तर, “महल परिसरातील आरएसएस मुख्यालयात संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान बैठक झाली,” असं विश्वसनीय सुत्रांनी सांगितलंय. दोघांमध्ये तासभर नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बोबडे यांनी संघ मुख्यालयात संघप्रमुखांची औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय त्यांनी आरएसएसचे संस्थापक केबी हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही भेट दिल्याची माहिती मिळतेय. बोबडे यांनी भेट दिलेल्या घरात हेडगेवार यांचा जन्म झाला होता. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने असलेल्या या घराची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे, याबद्दल बोबडे यांनी जाणून घेतली, अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.

माजी सरन्यायाधीश बोबडे हे नागपूरचे आहेत. त्यांनी अनेक वर्षे नागपुरातच कायद्याची प्रॅक्टिस केली होती. बोबडे या वर्षाच्या सुरुवातीला निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांचा पूर्ण वेळ दिल्ली आणि नागपुरात घालवत आहेत.