‘अच्छे दिन’ आणायचे असेल तर पैसे लागतात, पण महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली (भिकारचोट) आहे. हे कफल्लक सरकार आहे, त्यांच्या खिशाला भोकं पडली आहेत, अशी टीका महाराष्ट्राचे माजी अधिवक्ता आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केली.

विदर्भ राज्य आघाडीतर्फे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी १ मे पासून रक्ताक्षरी अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप रविवारी संविधान चौकात झाला. याप्रसंगी अ‍ॅड. अणे बोलत होते. राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कर्ज फेडण्यासाठी ६० टक्के पैसे खर्च होतात. उरलेले ४० टक्के उत्पन्न हे जीएसटीपोटी केंद्र सरकार घेऊन गेले आहे. यामुळे महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचे पैसे संपले असून राज्य सरकारला आपल्या हिश्शाचे पैसे आणण्यासाठी दिल्लीपुढे हात पसरावे लागतात, असे अणे म्हणाले. इतर राज्यातही अशीच स्थिती असल्याचे सांगताना त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. नितीश कुमार यांनाही केंद्राच्या मदतीसाठी मोदींच्या गोटात जावे लागले, असा दावा त्यांनी केला.

देशात मोदी आणि शाह हे दोनच नेते आहेत. त्यातील पंतप्रधान कोण हे कळत नाही, पण त्यांना वाटेल तसेच देशात होते. मोदी कुणाचेही ऐकत नाहीत, असे खुद्द भाजपचे खासदार सांगतात. अशा स्थितीत १० हजार रक्ताक्षऱ्या बघून मोदींचे मत परिवर्तन होईल याची शक्यता नाही. शेतकरी आत्महत्येचा आकडा ३३ हजारावरून ६६ हजारावर गेला तरी त्यांना ‘बुलेट ट्रेन’ आणायची आहे. ‘अच्छे दिन’ येणार नाही. हे लोकांना कळले आहे. आता भाजपला प्रत्येक निवडणुकीत हरवावे लागेल, भाजप आणि काँग्रेस एक क्रमांकाचे शत्रू असून विदर्भवादी नेत्यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सन्याल, सचिव अ‍ॅड. निरज खांदेवाले, ज्येष्ठ विदर्भवादी नेते उमेश चौबे, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, चरणसिंग ठाकूर, प्रमोद मानमोडे, अनिल जवादे, श्रीकांत तराळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीपत्रावर सुमारे १० हजार विदर्भवासीयांनी स्वाक्षरी केली आहे. रक्ताक्षरी करून अभियानाचा प्रारंभ करणारे अ‍ॅड. अणे यांनी आज पुन्हा रक्ताक्षरी केली.

वेडय़ांचे सरकार

राज्याचा महाधिवक्ता म्हणून गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता, परंतु आज गोवंशच्या नावाखाली माणसं मारली जात आहेत. आपल्या विचाराशी सहमत नसणाऱ्यांची हेटाळणी केली जात आहे. विचारांना विरोध करणाऱ्यांना ठार केले जात आहे. देशात अशाप्रकारे अनेक बेकायदेशीर घटना घडत आहेत आणि वेडय़ांचे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, अशी कडवट टीका अ‍ॅड. अणे यांनी केली.